नितेश राणेंच्या 'त्या' वक्तव्यानंतर तृतीयपंथींनी केले 'जोडे माराे' आंदोलन
#बंडगार्डन
ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी नागपूरातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या टीकेनंतर भाजप आक्रमक झाली आहे. भाजपकडूनही माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला केला जात आहे. दरम्यान भाजपचे आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करताना केलेल्या विधानावरून नवा वाद पेटला आहे. ठाकरे यांच्यावर टीका करतेवेळी भाजपचे नेते आमदार नितेश राणे यांनी ‘हिजडा’ या शब्दाचा वापर केला. त्या पार्श्वभूमीवर नितेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे, या मागणीसाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात तृतीयपंथींनी जोडे मारो आंदोलन केले.
नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करत त्यांचा एक मॉर्फ केलेला फोटो ट्वीट केला होता. यासोबतच त्यांनी, 'मर्दानगी वर कलंक ! हिजड्यांच्या प्रमुखांकडुन अजुन काय अपेक्षा.. बायला कुठला' असे कॅप्शन दिले होते. यानंतर राणे यांच्या विरोधात तृतीयपंथी आक्रमक झाले असून त्यांच्याकडून विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. आमदार नितेश राणे यांच्याविरोधात पुण्यातील बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या बाहेर तृतीयपंथी समाजाच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तर त्याचवेळी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातही रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
शामिभा पाटील यांच्यासोबत असलेल्या अन्य सहकार्यांना बंडगार्डन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर या घटनेची माहिती ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे, वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर, अड. असीम सरोदे यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट घेऊन पोलिसा सोबत चर्चा केली. नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी केली.
यावेळी तृतीपंथी हक्क समितीच्या राज्य समन्वयक शामिभा पाटील म्हणाल्या की, आमच्या हक्कासाठी आम्ही लढा देत असून आम्हाला न्याय मिळावा यासाठी कोणताही लोकप्रतिनिधी पुढे येत नाही. पण त्याच दरम्यान भाजपचे आमदार नितेश राणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करतेवेळी हिजडा या शब्दाचा वापर केला आहे. त्या विधानाच्या पार्श्वभूमीवर नितेश राणे विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा. या मागणीसाठी बंड गार्डन पोलिसाकडे मागणी केली. आमच्या मागण्यांची दखल घेतली नाही. त्यामुळे आम्ही आंदोलन केले. तर पोलिसांनी अमानुष पद्धतीने वागणूक दिली आहे. त्या गोष्टीचा निषेध व्यक्त करीत असून जोवर नितेश राणे विरोधात गुन्हा दाखल होत नाही आणि कारवाई होत नाही. तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार असल्याची भूमिका यावेळी त्यांनी मांडली.
यावेळी पोलीस सरकारच्या दबावामुळे राणेंविरोधात गुन्हा दाखल करत नसल्याचा आरोप तृतीयपंथी समाजाकडून करण्यात येत आहे. तसेच जोपर्यंत या प्रकरणी गुन्हा धाकल केला जात नाही तोपर्यंत अशाच पद्धतीने आंदोलने करणार असल्याचा इशारा तृतीयपंथींनी दिला. यावेळी शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.
feedback@civicmirror.in