दादांच्या 'शो'लेनंतर 'पार्थ-जय' मंचावर
विजय चव्हाण
राज्यातील सत्तेत उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार सहभागी होताच त्यांचे चिरंजीव पार्थ आणि जय पवार राजकारणात सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बालेवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने पार्थ आणि जय पवार उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यामुळे स्पर्धेच्या निमित्ताने जनसंपर्क वाढविण्यास या दोघांची सुरुवात झाली असून, त्यांच्या सक्रिय राजकारणाचे संकेत मिळत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करून अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री आणि अर्थ खाते देण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर राज्यातील सत्ता समीकरणेही झपाट्याने बदलली आहेत. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचे दोन्ही चिरंजीव पार्थ आणि जय हे राजकारणात सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. अजित पवारांची पत्नी सुनेत्रा पवार या दोन्ही मुलांच्या राजकीय कारकिर्दीसाठी विशेष आग्रही होत्या.
पार्थ पवार यांनी २०१९ मध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढविली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर पिंपरी-चिंचवड आणि मावळ लोकसभा मतदारसंघात काही कार्यक्रमांना पार्थ उपस्थित होते. मात्र, त्यानंतर ते सक्रिय राजकारणातून बाजूला झाले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केल्यानंतर अजित पवार यांनी मुंबईत समर्थक-कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. त्या वेळी जय हे अजित पवार यांच्या समवेत दिसून आले होते. मात्र, बदललेल्या राजकीय परिस्थितीत पार्थ आणि जय पवार सक्रिय राजकारणात उतरले असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
पार्थ आणि जय पवार हे दोघे प्रथमच एका व्यासपीठावर मंगळवारी आले. अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने बालेवाडी येथील क्रीडा संकुलात कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन या दोघांच्या हस्ते झाले. स्पर्धेच्या निमित्ताने जनसंपर्क वाढविण्यास सुरुवात झाली असून, येत्या काही दिवसांत पार्थ आणि जय राजकीय व्यासपीठावर दिसतील, अशी चर्चा अजित पवार समर्थकांमध्ये सुरू झाली आहे.
नाव न सांगण्याच्या अटीवर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे एक आमदार म्हणाले, " या स्पर्धेच्या निमित्ताने दोघांनीही जनसंपर्क वाढविण्यास सुरुवात केली आहे. या आधी मावळ निवडणुकीत झालेला पराभव आणि एकूणच वडील अजित पवारांची झालेली पिछेहाट यामुळे कुटुंबही अस्वस्थ होते. मुलांचे राजकीय भविष्य कुटुंबांतर्गत संघर्षात धोक्यात आले होते. अजित पवारांच्या सत्ता-नाट्यानंतर दोन्ही युवराजांना 'स्पेस' मिळाली आहे. त्यांचे यथावकाश 'लॉंचिंग' ही होईलच; पण भविष्यात पार्थ विरुद्ध रोहित असे चित्रही निर्माण होऊ शकते.
दरम्यान, अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्याला ५४ पैकी ४१ आमदार अजित पवार यांच्याबरोबर असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र, अनिवासीय भारतीयांसाठी (एनआरआय) काम करणाऱ्या राष्ट्रवादीच्या ‘डिपार्टमेंट ऑफ ओव्हरसीज इंडियन’च्या पदाधिकाऱ्यांनी आम्ही शंभर टक्के शरद पवार यांच्या मागे खंबीरपणे उभे आहेत, अशी भूमिका स्पष्ट केली होती. त्यानंतर युवक राष्ट्रवादीनेदेखील आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचे जाहीर केले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.