प्रशासन हलले, विजेचे खांब हलवले
राजानंद मोरे
विजेच्या खांबांची चोरी उघडकीस आणत ‘सीविक मिरर’ने पालिका प्रशासनाचा पोलखोल केल्यानंतर पुणे महापालिकेच्या विद्युत विभागातील अधिकाऱ्यांना जाग आली आहे. मुख्य भांडार डेपोसमोर उघड्यावर पडलेले विजेचे खांब डेपोमध्ये सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहेत. मागील अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू होता. सुरुवातीला याबाबत अधिकारी केवळ कार्यवाहीबाबत बोलत होते. याबाबत सीविक मिररने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर त्याची दखल घेण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांच्या पैशांतून खरेदी करण्यात आलेल्या साहित्यावरील दरोडा थांबणार आहे.
विजेचे खांब दिवसाढवळ्या करवतीने कापून भंगाराच्या दुकानात विकले जात असल्याचा प्रकार ‘सीविक मिरर’ प्रतिनिधींनी केलेल्या स्टींग ऑपरेशनवेळी उघडकीस आला होता. याबाबतचे ‘पालिकेवर दिवसाढवळ्या दरोडा’ हे वृत्त १४ फेब्रुवारी रोजी प्रसिध्द झाले होते. जवळपास आठ ते दहा महिला नायडू रुग्णालयालगतच्या भांडार विभागाच्या समोरील मोकळ्या जागेत असलेले विद्युत खांबे प्रत्येक रविवारी चोरून नेत असल्याचे स्टींग ऑपरेशनमधून स्पष्ट झाले होते. चोरलेल्या खांबांची मंगळवार पेठेतील भंगाराच्या दुकानात विक्री करून पैसे कमविले जात असल्याचा धक्कादायक प्रकार अनेक दिवसांपासून सुरू होता. याबाबत विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना कल्पना देण्यात आली. त्यावेळी त्यांनी हे खांब सुरक्षित ठिकाणी हलविणार असल्याचे सांगितले होते. पण पंधरा दिवस उलटले तरी स्थिती ‘जैसे थे’ होती.
अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे विजेच्या खांबांची चोरी सुरूच होती. सीविक मिरर प्रतिनिधींनी याबाबत पुन्हा पाठपुरावा केला. ‘पोलखोल थांबेनाच’ हे वृत्त १ मार्च रोजी प्रसिध्द करण्यात आले. त्याआधी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून याबाबत कल्पना देण्यात आली. त्यांनी आचारसंहितेचे कारण देत कर्मचारी त्या कामात व्यस्त असल्याने खांब सुरक्षित ठिकाणी हलविले नसतील, असे उत्तर दिले. तसेच काही खांब तिथून हलविले असल्याचेही सांगितले. दुसऱ्यांदा वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर मात्र अधिकाऱ्यांना खडबडून जाग आली असून सर्व खांब सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहेत. भांडार विभागाच्या डेपोमध्ये हे खांब ठेवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
याविषयी विद्युत विभागाच्या अधीक्षक अभियंता मनीषा शेकटकर म्हणाल्या, ‘विजेचे सर्व खांब भांडार विभागाच्या डेपोमध्ये हलविले आहेत. आता खांब सुरक्षित राहतील. तसेच २३ समाविष्ट गावांमध्ये आवश्यकतेनुसार हे खांब टप्पाटप्प्याने पाठविण्यात येणार आहेत. तिथे रस्त्याच्या कडेला हे खांब उभे करून विजेची व्यवस्था केली जाणार आहे.’
दरम्यान, पालिकेच्या भांडार विभागाच्या डेपोमध्ये आवश्यकतेनुसार खरेदी करण्यात आलेले साहित्य ठेवले जाते. तसेच जुन्या साहित्याचा लिलाव करून ते विकले जाते. पण विद्युत विभागाकडून डेपोच्या बाहेरील रस्त्याच्या कडेला विद्युत खांब, केबल्स साहित्य ठेवले होते. त्याचीच दिवसाढवळ्या चोरी होत होती. विद्युत विभागाने याबाबत भांडार विभागालाही कळविले नसल्याचे अधिकाऱ्यांनीच सांगितले होते. त्यामुळे दोन विभागातील विसंवादही समोर आला होता.
दरम्यान, विजेचे खांब हलवले असले तरी याच परिसरात विद्युत विभागाच्याच केबल्स व नवे पाईप्स उघड्यावर पडल्या आहेत. केबल्समध्ये तांब्याच्या तारा असतात. त्या महागड्या असल्याने त्याचीही चोरी होण्याची भीती आहे. या केबल्स जाळून त्यातून तांब्याच्या तारा काढून भंगारात विकल्या जाऊ शकतात. लोखंडापेक्षा तांब्याच्या तारांतून चोरट्यांचा अधिक फायदा होऊ शकतो. आता लोखंडी खांब हलवल्यामुळे संबंधित महिलांकडून केबल्सवर डल्ला मारला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.