अतिरिक्त आयुक्तांसह दोन उपायुक्त होणार रुजू
रोहित आठवले
TWEET@RohitA_mirror
पिंपरी-चिंचवड शहरासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची पदे निर्माण करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी (२८ जून) मान्यता दिली आहे. त्यानुसार एक अतिरिक्त पोलीस आयुक्त आणि दोन पोलीस उपायुक्त ही पदे निर्माण केली जाणार आहेत. 'सीविक मिरर'ने याबाबतचे वृत्त सर्वप्रथम प्रसिद्ध केले होते.
राज्य मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक बुधवारी पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. बैठकीत पिंपरी-चिंचवड शहरासाठी तीन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची पदे निर्माण करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात शहरीकरण वेगाने होत आहे. औद्योगीकरणाचा विस्तार होत आहे. शहरातील वाढत्या वाहन संख्येमुळे अपघात आणि दुर्घटना दिवसेंदिवस वाढत आहे. गुन्हेगारांच्या संख्येतील वाढीमुळे पोलिसांच्या कामाची व्याप्ती वाढली आहे. वाढत्या कामाच्या व्याप्तीमुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची आयुक्तालयाला गरज होती.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनीही पदभार स्वीकारल्यापासून शासनाकडून वाहने मिळविणे, अतिरिक्त कर्मचारी-अधिकाऱ्यांची पदे मंजूर करून घेतली आहेत. एक अतिरिक्त आयुक्त (उपमहानिरीक्षक दर्जा), दोन उपायुक्त (अतिरिक्त अधीक्षक दर्जा) आणि चार साहाय्यक आयुक्त पदे मिळण्यासाठी शासनाकडे आयुक्त चौबे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानुसार ही पदे निर्माण करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. पदे भरण्याची प्रक्रियादेखील लवकरच केली जाणार आहे.
आयुक्तालय कार्यान्वित करताना पाच वर्षांपूर्वी एक आयुक्त, एक अतिरिक्त आयुक्त, तीन उपायुक्त, सात सहायक आयुक्त आणि अन्य अधिकारी-कर्मचारी संख्याबळ मंजूर करण्यात आले होते. कालांतराने दीड वर्षांनी तात्पुरत्या स्वरूपात सहआयुक्त (विशेष महानिरीक्षक दर्जा) हे पद मंजूर करण्यात आले. तेथील अधिकारी निवृत्त झाल्यानंतर पुन्हा काही वर्षांसाठी हे पद रद्द झाले होते. त्यानंतर तीन महिन्यांपूर्वी पुन्हा एक वर्षासाठी पदनिर्मिती करण्यात आली आहे. त्यानंतर आता आयुक्त चौबे यांनी अन्य पद मंजूर करून घेतल्याने शहरात चार आयपीएस अधिकारी नियुक्त होणार आहेत. यामध्ये स्वत: आयुक्त, सहआयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि नव्याने येणाऱ्या अतिरिक्त आयुक्तांचा समावेश असणार आहे.
मावळ-चाकण भागातील वाढते नागरीकीकरण आणि गुन्हेगारीचे स्वरूप पाहता या भागासाठी स्वतंत्र पोलीस उपायुक्त परिमंडळ तयार करण्यात येणार असल्याचे यापूर्वी आयुक्त चौबे यांनी सांगितले होते. त्यानंतर आता दोन उपायुक्त पदे मंजूर झाल्याने एक उपायुक्त हे नव्याने तयार करण्यात येणाऱ्या परिमंडळासाठी नियुक्त केले जाणार आहेत. तर, एक उपायुक्त हे विशेष शाखा आणि वाहतूक शाखेचा पदभार सांभाळणार आहेत.
नव्याने एक परिमंडळ तयार केल्यानंतर त्यांच्या अखत्यारित दोन विभाग करावे लागणार असून, त्यासाठी दोन विभागीय साहाय्यक आयुक्तांची गरज भासणार असून, त्याकरिता नव्याने साहाय्यक आयुक्तांची नियुक्ती करण्याची आवश्यकता आहे.
रिस्पॉन्स टाईम कमी करून नागरिकांना तत्परतेने सुविधा पोहचविण्याचे काम सध्या आयुक्तालयांतर्गत असलेल्या शहरी भागात होत आहे. परंतु, ग्रामीण भागात गावागावातील अंतर अधिक असल्याने तेथे पोलिसांना पोहोचण्यास विलंब होऊन तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे येथील भागातील नागरिकांना तत्पर मदत मिळण्यासाठी अधिकारी वाढविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे आयुक्त चौबे यांनी यापूर्वी सांगितले होते.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.