उद्योगनगरीच्या बजेटला प्रशासक वर्षपूर्तीचा योग

आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता कोणतीही कर आणि दरवाढ नसलेला ६.३० कोटी रुपये शिल्लक रकमेचा २०२३-२४ या वर्षासाठी ७ हजार १२७ कोटी ८८ लाखांचा अर्थसंकल्प मंगळवारी (दि. १४) मांडण्यात आला. पिंपरी-चिंचवड महापालिकेवर प्रशासक नेमणुकीच्या वर्षपूर्तीनंतर दुसऱ्या दिवशी हा अर्थसंकल्प सादर झाला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Wed, 15 Mar 2023
  • 11:19 am

उद्योगनगरीच्या बजेटला प्रशासक वर्षपूर्तीचा योग

२०२३-२४ या वर्षासाठी ७,१२८ कोटींचा अर्थसंकल्प

रोिहत आठवले

rohit.athavale@civicmirror.in

TWEET@RohitA_mirror

आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता कोणतीही कर आणि दरवाढ नसलेला ६.३० कोटी रुपये शिल्लक रकमेचा २०२३-२४ या वर्षासाठी ७ हजार १२७ कोटी ८८ लाखांचा अर्थसंकल्प मंगळवारी (दि. १४) मांडण्यात आला. पिंपरी-चिंचवड महापालिकेवर प्रशासक नेमणुकीच्या वर्षपूर्तीनंतर दुसऱ्या दिवशी हा अर्थसंकल्प सादर झाला.

या अर्थसंकल्पासाठी महापालिकेच्या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. मूळ अर्थसंकल्प ५२९८ कोटी रुपयांचा असून, केंद्र आणि राज्य सरकारच्या पुरस्कृत योजनेसह ७१२७ कोटी रुपयांचा प्रारूप अर्थसंकल्प लेखा विभागाने महापालिका आयुक्त शेखरसिंह यांच्याकडे स्थायी समितीला सादर केला.

केंद्र आणि राज्य सरकारच्या अनुदानावर महापालिकेचा डोलारा उभा असून बँकांतील ठेवींचाही आधार घेण्यात आला आहे. उत्पन्नवाढीच्या नव्या स्राोतांच्या अभावाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी सादर केलेला आहे. यात मोठ्या प्रकल्पांसाठी पीपीपी आणि म्युनिसिपल बाॅंड्सचा आधार घेण्यात आला आहे.

प्रशासक तथा आयुक्त शेखरसिंह यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची विशेष सभा झाली. मुख्य लेखाधिकारी जितेंद्र कोळंबे यांनी हा अर्थसंकल्प तयार केला आहे. आयुक्त शेखर सिंह यांच्या कारकिर्दीतला पहिला अर्थसंकल्प असून महापालिकेचा हा ४१ वा अर्थसंकल्प आहे. यावेळी अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, प्रदीप जांभळे पाटील आदी उपस्थित होते.

निवडणुकीचे वर्ष असल्याने या अर्थसंकल्पाद्वारे पिंपरी-चिंचवडवासियांवर करवाढीचा बोझा टाळण्यात आला आहे. अपवाद वगळता नव्या घोषणा केलेल्या नाहीत. महापालिकेचे उत्पन्न कसे वाढणार, यावर अर्थसंकल्पात काहीही भाष्य नाही. त्यासाठीचा कोणताही 'रोड मॅप' आखलेला नाही. मालमत्ताकर, जीएसटी आणि बांधकाम विकास शुल्क हे पारंपरिक आर्थिक स्रोत सक्षम करून त्यातून उत्पन्न वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा आणि वाहतूक या घटकांवर प्राधान्याने लक्ष केंद्रित करतानाच त्यासाठी निधी राखून ठेवण्यात आला आहे. सुरू असलेले पाणीपुरवठा, सांडपाणी प्रकल्प आणि उड्डाणपूल पूर्ण करण्यावर अर्थसंकल्पात भर देण्यात आला असल्यामुळे कोणतेही नवे प्रकल्प महापालिका आयुक्तांनी सुचविलेले नाहीत.

यावेळी आयुक्त शेखरसिंह म्हणाले, ‘‘एकात्मिक विकास या संकल्पनेनुसार महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधा निर्माण करून रस्ते, पूल याबरोबरच रुग्णालये, क्रीडांगणे, शाळा अशा बाबींच्या निर्मितीवर भर देऊन शहर हे सुलभ दळणवळण, आधुनिक वैद्यकीय सेवा आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढून वेगवेगळ्या खेळांना आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यायोग्य बनवून शहरातील सर्व घटकांना या सुविधा सहज उपलब्ध करून देण्याचा माझा मानस आहे. पायाभूत सुविधा निर्माण करण्याबरोबरच हे शहर पर्यावरणपूरक बनवून नागरिकांचे आरोग्य आणि राहणीमान उंचावणे, नागरिकांची सुरक्षितता जपणे, विविध उद्याने अद्ययावत करून विरंगुळ्याची साधने निर्माण करणे तसेच शहरातील सर्व सामाजिक घटकांना आवश्यक त्या सेवा तत्काळ उपलब्ध करून देण्याचा माझा मानस आहे.’’

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story