खडकवासला धरणालगत ‘गावठी’चा अड्डा

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणाच्या पाण्याला अगदी लागून कच्च्या गावठी दारूने भरलेले तब्बल चाळीसपेक्षा जास्त प्रत्येकी दोनशे लिटरचे बॅरल गुरुवारी आढळून आले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Fri, 31 Mar 2023
  • 05:30 pm
खडकवासला धरणालगत ‘गावठी’चा अड्डा

खडकवासला धरणालगत ‘गावठी’चा अड्डा

परिसरात रसायनमिश्रित वास येत असल्याची नागरिकांची तक्रार; तीन दिवसांत उपाययोजना करण्याची सूचना

सीविक मिरर ब्यूरो

feedback@civicmirror.in

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणाच्या पाण्याला अगदी लागून कच्च्या गावठी दारूने भरलेले तब्बल चाळीसपेक्षा जास्त प्रत्येकी दोनशे लिटरचे बॅरल गुरुवारी आढळून आले.

ओसाडे (ता. वेल्हे) गावच्या हद्दीत पुणे-पानशेत रस्त्यापासून केवळ पन्नास ते शंभर मीटर अंतरावर खडकवासला धरणाच्या पाण्याच्या कडेने डोंगर कपारीत गाडलेले कच्च्या गावठी दारूचा साठा असलेले  तब्बल चाळीस बॅरल आढळून आले. ज्या ठिकाणी ही दारूची भट्टी आहे तेथील परिसरात कुजलेल्या कच्च्या दारूची उग्र दुर्गंधी येत होती. तसेच धरणाच्या पाण्यात व कडेने कोळशांचा खच पडलेला होता.  सांडलेले कच्च्या दारूचे रसायन, इतर घाण ही थेट पुणेकरांची तहान भागवणाऱ्या खडकवासला धरणाच्या पाण्यात मिसळत असल्याचे निष्पन्न झाले.

या ठिकाणी अनेक वर्षांपासून राजरोसपणे गावठी दारूची भट्टी सुरू असून 'जाणीवपूर्वक' कारवाई करण्यात येत नसल्याचा आरोप नागरिक करत होते.वेल्हे येथील सहायक पोलीस निरीक्षक मनोज पवार पोलीस म्हणाले की, तातडीने संबंधित ठिकाणी पोलिसांची टीम पाठवण्यात आली असून कच्च्या गावठी दारूचा साठा नष्ट करण्याचे काम सुरू आहे. नागरिक जरी आरोप करत असले तरी याबाबत आम्हाला अगोदर माहिती नव्हती. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार असून संबंधितांचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्यात येणार आहे. 

सध्या तलावाच्या परिसरात शासकीय जागांवर ‘फार्म हाऊस’ व ‘बंगले’ यांचे अतिक्रमण वाढले आहे.  धरण तलावात मोठ्या भिंती बांधणे, जवळचे डोंगर फोडून, मोठय़ा प्रमाणात मुरूम व राडारोडा टाकणे असे प्रकार होत आहेत. त्यामुळे तलावाचे क्षेत्रफळ व पाणलोट क्षेत्र मोठय़ा प्रमाणात कमी होत आहेत . खडकवासला धरणाची मूळ साठवण क्षमता खूप जास्त होती. ती अतिक्रमणे आणि साचलेल्या गाळामुळे सध्या १.७५ अब्ज घनफूट (टीएमसी) एवढेच पाणी त्यात साठते.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story