होर्डिंगसाठी झाडांची कत्तल करणाऱ्यांवर पिंपरीत कारवाई

होर्डिंग दिसावेत म्हणून झाडे तोडल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड महापालिकेने शहरातील पाच ठिकाणी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यातील एक गुन्हा सध्या भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. अन्य गुन्हे सांगवी, वाकड, भोसरी, चिखली या चार पोलीस ठाण्यात दाखल करण्याची प्रक्रिया मागील काही महिन्यांपासून सुरू आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Rohit Athavale
  • Sat, 5 Aug 2023
  • 12:42 pm
होर्डिंगसाठी झाडांची कत्तल करणाऱ्यांवर िपंपरीत कारवाई

होर्डिंगसाठी झाडांची कत्तल करणाऱ्यांवर पिंपरीत कारवाई

पर्यावरण प्रेमींनी आवाज उठविल्यावर महापालिकेला आली जाग, पाच ठिकाणी गुन्हे दाखल होणार

रोहित आठवले

rohit.athavale@civicmirror.in

TWEET@RohitA_mirror

होर्डिंग दिसावेत म्हणून झाडे तोडल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड महापालिकेने शहरातील पाच ठिकाणी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यातील एक गुन्हा सध्या भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. अन्य गुन्हे सांगवी, वाकड, भोसरी, चिखली या चार पोलीस ठाण्यात दाखल करण्याची प्रक्रिया मागील काही महिन्यांपासून सुरू आहे.

शहरातील अनधिकृत होर्डिंगचा प्रश्न गाजत असतानाच होर्डिंग कोसळून पाच निष्पाप लोकांचा बळी गेला होता. त्याच दरम्यान पिंपरी चिंचवडमध्ये अनेक ठिकाणी होर्डिंग दिसत नसल्याने झाडे तोडली जात होती. त्यामुळे पर्यावरण प्रेमींनी अनेकदा याबाबत तक्रार केली होती. परंतु, महापालिका याबाबत तक्रार घेण्यास चालढकल करीत होते.

‘गुगल अर्थ’वर झाडे तोडण्यापूर्वीचे आणि तोडल्यानंतरचे फोटो उपलब्ध असताना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकाऱ्यांना याची कोणतीच कल्पना नसल्याचे समोर आले होते. शहरातील वृक्षतोड हा कळीचा मुद्दा बनला असतानाच हा नवा उद्योग समोर आला आहे. दुसरीकडे होर्डिंग अनधिकृत की अधिकृत या वादात असतानाच या झाडांची कत्तल केल्यावर लाखो रुपयांच्या लाकडांचे झाले काय असा सवाल देखील आता उपस्थित केला जात आहे.

विशेष म्हणजे गूगल अर्थ वर झाडे तोडण्यापूर्वीचे आणि नंतरचे फोटो उपलब्ध असताना याची जबाबदारी असणाऱ्या आणि रस्त्याने प्रत्यक्ष फिरून पाहणी करणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांकडे याची माहिती उपलब्ध नसल्याचे दिसते. मुळा नदी पुनरूज्जीवन प्रकल्पासाठी नदीपात्रानजीकची किती झाडे तोडावी लागतील याची माहिती देखील पर्यावरण विभागाकडे उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे. खासगी जागांमधील होणाऱ्या झाडांची कत्तलीबाबत मतमतांतरे असतानाच रस्त्यावरील झाडांची कत्तल होऊ लागली आहे.

यापूर्वी हिंजवडी रस्त्यावरील काही झाडांची अशाच प्रकारे कत्तल झाल्याचे उघड झाले होते. शहरात अधिकृत १४०० होर्डिंग असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. साहजिकच अनधिकृत होर्डिंगचा आकडा हा यापेक्षा अधिक असल्याचे दिसून येते. 

हरित शहर म्हणून पिंपरी-चिंचवडची ओळख आता होर्डिंगवरील जाहिरातींसाठी पुसत चालली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्य इमारतीसमोरील एका बँकेच्या दारात असलेला ३० वर्षांपूर्वीचा मोठा वृक्ष रातोरात बुंध्यापासून तोडण्यात आला आहे.  त्याची कोणतीच माहिती संबंधितांकडे उपलब्ध नाही.

शहरातील झाडांची अशाच प्रकारे कत्तल वाढत राहिल्याने संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी होत आहे. होर्डिंग बरोबरीनेच शहरात विविध कारणांसाठी केबलचे जाळे उभारणाऱ्यांकडून देखील झाडांची कत्तल केली जात आहे. पिंपरी चौकातील मोठा वृक्ष देखील याच कारणासाठी तोडल्याचे दिसून येते.

पिंपरी-चिंचवड महापालिका हायटेक असल्याचा डंका अधिकाऱ्यांकडून पिटला जातो. अनेक पुरस्कार देखील या कारणाने महापालिकेने पदरात पाडून घेतले आहेत. मात्र, चौका-चौकातील झाडे रातोरात तोडली जात असल्याची माहिती महापालिकेकडे मिळत नाही. गुगल अर्थवर याच झाडांचे पूर्वीचे आणि नंतरचे फोटो उपलब्ध असतानाही या झाडांची कत्तल करणाऱ्यांवर कारवाई करण्यात महापालिका कूचकामी ठरताना दिसत आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story