वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वाघोलीत कारवाई
सीविक मिरर ब्यूरो
पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी वाघोलीत मंगळवारी (दि. ९) महामार्गाच्या दुभाजकापासून १५ मीटर अंतरावरील अनेक अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. पुणे महापालिका, पीएमआरडीए आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. काही पक्की बांधकामे, पत्र्याचे शेड, ओटे, बोर्ड, स्टाॅल्स आदींवर ही कारवाई करण्यात आली. यासाठी मोठा फौजफाटा तैनात ठेवण्यात आला होता.
महामार्गाच्या दुभाजकापासून १५ मीटर अंतर मोजून कारवाई करण्यात येत होती. या अंतराच्या आत ज्यांची पक्की बांधकामे होती त्यांना १५ दिवसांपूर्वी नोटीस बजावण्यात आली होती. यामुळे काही व्यावसायिकांनी जो भाग १५ मीटरमध्ये येतो तो खाली केला होता. या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले. ‘‘कारवाईत सातत्य ठेवून जो भाग मोकळा केला आहे, तो यापुढेही मोकळाच राहील, याची खबरदारी महापालिकेने घ्यावी’’ अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली. महापालिका सहायक आयुक्त सोमनाथ बनकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
पुणे-नगर महामार्गालगत एका नेत्याचे कार्यालय तसेच चार गाळे आहेत, तर एका नेत्याशी संबंधित काही फूड स्टाॅल्स १५ मीटरच्या आत होते. या दोन्हीवर कारवाई होते का, याकडे सर्वांचे लक्ष होते. यापैकी एका नेत्याने अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र अधिकाऱ्यांनी त्याचे ऐकले नाही. दोन्ही अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.