राठी हत्याकांडातला आरोपी २८ वर्षांनंतर ठरला अल्पवयीन

अंगाचा थरकाप उडवणाऱ्या राठी कुटुंब हत्याकांडातील दोषी आणि फाशीची शिक्षा सुनावलेला आरोपी नारायण चेतनराम चौधरी याची येरवडा मध्यवर्ती कारागृहातून तब्बल २८ वर्षांनंतर सुटका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हत्याकांडावेळी तो अवघ्या १२ वर्षांचा होता, या युक्तिवादावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. तसेच त्याची तत्काळ सुटका करण्याचे आदेश दिले आहेत.फाशीच्या शिक्षा सुनावताना चौधरी २२ वर्षांचे असल्याचे दाखवले होते.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Tue, 28 Mar 2023
  • 11:51 am
राठी हत्याकांडातला आरोपी  २८ वर्षांनंतर ठरला अल्पवयीन

राठी हत्याकांडातला आरोपी २८ वर्षांनंतर ठरला अल्पवयीन

घटनेवेळी चौधरी १२ वर्षांचा असल्याच्या युक्तिवादावर सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब, तत्काळ सुटका करण्याचे आदेश

प्रसन्नकुमार केसकर

feedback@civicmirror.in

अंगाचा थरकाप उडवणाऱ्या राठी कुटुंब हत्याकांडातील दोषी आणि फाशीची शिक्षा सुनावलेला आरोपी नारायण चेतनराम चौधरी याची येरवडा मध्यवर्ती कारागृहातून तब्बल २८ वर्षांनंतर  सुटका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हत्याकांडावेळी तो अवघ्या १२ वर्षांचा होता, या युक्तिवादावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. तसेच त्याची तत्काळ सुटका करण्याचे आदेश दिले आहेत.फाशीच्या शिक्षा सुनावताना चौधरी २२ वर्षांचे असल्याचे दाखवले होते.

 न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस, केएम जोसेफ आणि हृषिकेश रॉय यांच्या खंडपीठाने सोमवारी त्यांचा किशोरवयाचा दावा खरा असल्याचा निष्कर्ष काढून त्यांची सुटका करण्याचे आदेश दिले. चौधरी याने १९९४ मध्ये राठी कुटुंबातील दोन मुले, एक गरोदर महिला आणि कुटुंबातील घरकामगार यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी २८ वर्षे तुरुंगवास भोगला आहे. 

मीराबाई राठी (४५ ), तिची सून बबिता (२५), नीता राठी (२२ ), अविवाहित मुलगी प्रीती (१९), विवाहित मुलगी हेमलता नावंदर (२७ ), बबिता यांचा अडीच वर्षांचा मुलगा चिराग, हेमलता यांचा दीड वर्षांचा मुलगा, घरकाम करणारी सत्यभामाबाई सुतार (४२ ) यांची हत्या करण्यात आली होती. २६ ऑगस्ट १९९४ रोजी कोथरूड येथील हिमांशू अपार्टमेंट, शिलाविहार कॉलनी, पौड  फाटा येथील फ्लॅटमध्ये ही घटना घडली होती.  

 मीराबाईंचे पती केसरीमल आणि बबिता यांचे पती संजय यांचे कर्वे रोडवर सागर मिठाईचे दुकान आहे. या गुन्ह्यात राजू राजपुरोहित, जितेंद्र गेहलोत आणि नारायण चौधरी हे सर्व मूळ राजस्थानचे रहिवासी असल्याचा आरोप होता. आरोपींनी आधी दरोड्याचे सर्व पुरावे पुसून टाकण्यासाठी ही हत्या केली होती. 

पान १ वरून

फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, मुकलावा जिल्हा, गंगानगर, राजस्थान येथील रहिवासी राजू राजपुरोहित हा १९९४ मध्ये ११ वीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर नोकरी शोधण्यासाठी आणि पुढील शिक्षण घेण्यासाठी पुण्यात आला होता. त्यांनी लक्ष्मी रोडवरील बॉम्बे विहार येथे काम केले, तेथेच  नारायण आणि जितू हे स्वयंपाकी आणि काउंटर सेल्समन म्हणून काम करत होते.  ते येरवडा येथील नागपूर चाळीत एकत्र राहात होते. राजू त्यानंतर 'सागर स्वीट्स'मध्ये कामाला गेला होता. पगारवाढीची विनंती राठींनी फेटाळल्याने त्यांनी नोकरी सोडली होती. 

फिर्यादीनुसार,  या तिघांनी २३ ऑगस्ट १९९४  च्या रात्री राठीच्या घरी दरोडा टाकण्याचा निर्णय घेतला. २४ ऑगस्ट १९९४ रोजी त्यांनी एक चांदीचे पैंजण गहाण ठेवले आणि चाकू विकत घेतला. २५ ऑगस्ट १९९४ रोजी त्यांनी राठी यांच्या घराची पाहणी केली आणि दुसऱ्याच दिवशी त्यांची हत्या केली.  

खून करून ते पुण्यातून वेगवेगळ्या ठिकाणी पळून गेले. तथापि, ते २९ ऑगस्ट १९९४ रोजी अहमदाबाद येथे भेटले आणि राजस्थानमधील त्यांच्या मूळ गावी गेले. माजी पोलीस उपायुक्त माणिकराव दमामे आणि माजी पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे आणि विनोद सातव यांच्या नेतृत्वाखालील पुणे पोलिसांच्या पथकांनी त्यांना सप्टेंबर ते ऑक्टोबर १९९४  दरम्यान राजस्थानमधील वेगवेगळ्या ठिकाणांहून अटक केली.  राजू राजपुरोहित नंतर माफीचा साक्षीदार झाला. जिल्हा न्यायालयाने पूर्ण सुनावणीनंतर जितू गहलोत आणि नारायण चौधरी यांना फाशीची शिक्षा सुनावली. त्यानंतर उच्च न्यायालयाने या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले. तेव्हा चौधरी २२ वर्षांचे असल्याचे दाखवण्यात आले. फाशीच्या शिक्षेची पुष्टी झाल्यानंतर चौधरी आणि गेहलोत यांनी राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज सादर केला. ऑक्टोबर २०१६ मध्ये गेहलोतची फाशीची शिक्षा कमी करून जन्मठेपेत आणण्यात आली होती. तथापि, चौधरीने आपला दयेचा अर्ज मागे घेतला आणि गुन्ह्याच्या वेळी अल्पवयीन असल्याचा दावा करत सर्वोच्च न्यायालयासमोर पुनर्विचार याचिका दाखल केली. २०१५ मध्ये नारायण चौधरीची राजस्थानमधील त्याच्या शाळेतील जन्मदाखल्याची नोंद तपासण्यात आली. त्यामध्ये तो अल्पवयीन होता हे सिद्ध झालं, पण तो त्याचे वय सिद्ध करू शकला नाही कारण हा गुन्हा महाराष्ट्रात घडला होता आणि महाराष्ट्रात त्याने केवळ दीड वर्षे शिक्षण 

घेतलं होतं.

जानेवारी २०१९ मध्ये, सर्वोच्च न्यायालयाने पुण्याच्या प्रधान जिल्हा आणि सत्र न्यायाधीशांना चौधरी याचे वय तपासण्याचे निर्देश दिले. पुण्याच्या सत्र न्यायालयाने त्यांचा अहवाल दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने हा आरोपी गुन्हा घडला त्यावेळी अल्पवयीन असल्याचं सांगत त्याची तत्काळ सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. मयतांचे जवळचे नातेवाईक संजय राठी म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयानेच निकाल दिला असल्याने आमच्यासमोर पर्याय उरलेला नाही, तरी देखील नातेवाईक आणि वकिलांशी बोलून पुढचा 

निर्णय घेऊ. दरम्यान, आरोपींची बाजू ॲॅड. हर्षद िनंबाळकर यांनी मांडली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story