आता ‘अल्पवयीन’ मागचे प्रौढ सूत्रधार टार्गेट
विजय चव्हाण
vijay.chavan@civicmirror.in
शहरात भरदिवसा कोयते उगारून दहशत माजविणाऱ्या अल्पवयीन मुलांची गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलीस आयुक्त रितेशकुमार यांनी व्यूहरचना आखली आहे. अल्पवयीन मुलांना गुन्हेगारीत ओढणाऱ्या तसेच त्यांना पाठबळ देणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर करडी नजर ठेवून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
शहर तसेच उपनगरात गेल्या दोन महिन्यांपासून कोयते उगारून दहशत माजविण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. वेगवेगळ्या भागात दहशत माजविणाऱ्या कोयता गँगमधील बहुतांश आरोपी अल्पवयीन आहेत. अल्पवयीन मुलांच्या विरोधात कारवाई करताना पोलिसांना बाल गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यामुळे मर्यादा येतात. त्यामुळे कायद्यातील कठोर तरतुदींचा आधार घेऊन
अल्पवयीन मुलांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त रितेशकुमार यांनी शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना दिले आहेत. तसेच, गुन्हेगारीकडे वळलेल्या अल्पवयीन मुलांचे समुपदेशन करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. पोलीस ठाण्यांच्या पातळीवर अल्पवयीन मुलांचे समुपदेशन करण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
अल्पवयीन मुलांमध्ये गुन्हेगारीचे आकर्षण आहे. त्यामुळे अनेक अल्पवयीन मुले परिसरातील गुंड टोळ्यांच्या संपर्कात आली आहेत. समाजात प्रभाव पाडण्यासाठी अल्पवयीन मुले गुन्हेगारीकडे वळली आहेत. अल्पवयीन मुलांना गुन्हेगारीत ओढणाऱ्या तसेच त्यांना पाठबळ देणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या विरोधात कारवाई करणे तसेच त्यांना समज देण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली असल्याची माहिती गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी दिली.
अल्पवयीन मुलांच्या गंभीर गुन्ह्यातील सहभागाची माहिती संकलित करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. विविध गंभीर गु्न्ह्यात १६ ते १८ वयाेगटातील मुले सामील झाली आहेत. गेल्या सहा महिन्यात ४२ गुन्ह्यांमध्ये सामील
झालेल्या अल्पवयीन मुलांची चौकशी करण्यात आली. तेव्हा त्यांनी कोणाच्या तरी सांगण्यावरून गुन्हे केल्याची माहिती मिळाली आहे. गेल्या वर्षी गंभीर स्वरूपाच्या ३०३ गुन्ह्यांत ४७६ अल्पवयीन मुलांना ताब्यात
घेण्यात आले होते. पाेलीस आयुक्त रितेशकुमार, सहआयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त
रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेतील पथकांनी गुन्हेगारी टोळ्यांमधील अल्पवयीन मुलांची माहिती संकलित करण्याचे काम
सुरू केले आहे.
‘‘अल्पवयीन मुलांना गुन्हेगारी कृत्य करण्यासाठी पाठबळ देणाऱ्या सराईतांची माहिती घेण्यात आली आहे. अल्पवयीन मुलांना गुन्हेगारीकडे वळण्यास प्रवृत्त करणाऱ्या सराईतांच्या विरोधात कारवाई करण्यात येणार आहे,’’ असे पोलीस आयुक्त रितेशकुमार यांनी ‘सीविक मिरर’ला सांगितले.ं
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.