राजानंद मोरे
rajanand.more@civicmirror.in
TWEET@rajanandmirror
शहरात वाईन शॉप आणि बिअर शॉपींच्या बाहेर बेकायदा खुले बार सुरू असल्याचे समोर आले आहे. आता सरकारी कार्यालयेही मद्यपींचा अड्डा बनू लागल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सरकारी कार्यालयाला सुटी असल्यास मद्यपी आवारात घुसून ओल्या पार्ट्या करीत असल्याचे प्रकारही उघडकीस येऊ लागले आहेत. असाच प्रकार प्रादेशिक परिवहन विभागाच्या (आरटीओ) येरवड्यातील फुलेनगर कार्यालयात घडला आहे. याचबरोबर कार्यालयाच्या आवारात दहा वाहने पेटल्याची घटनाही रविवारी (ता.१५) घडली. यामागेही या ओल्या पार्ट्याच कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.
आरटीओच्या फुलेनगर येथील कार्यालयाला जप्त केलेल्या वाहनांचा विळखा पडला आहे. आवारात ठिकठिकाणी मद्याच्या बाटल्याही पडलेल्या आहेत. तिथे रात्रीच्या वेळी दारूच्या पार्ट्या रंगत असल्याचे अनेकजणांनी सांगितले. त्यातच कार्यालयाच्या आवारातील दहा वाहने मकर संक्रांतीच्या दिवशीच पेटली. त्यामध्ये चार मोटारी, चार बस, एक टेम्पो आणि एका डंपरचा समावेश होता. दोन बस व टेम्पो जळून खाक झाला आहे. त्यामुळे आवारात चालणाऱ्या गैरकृत्यांबाबत आता गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.
मोटार वाहन कायद्यानुसार नियमांचे पालन न करणारी वाहने आरटीओकडून जप्त केली जातात. दंड भरणे तसेच इतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ही वाहने संबंधित मालकाला परत केली जातात. तत्पूर्वी, ही वाहने आरटीओच्या संगम पूल तसेच फुलेनगर येथील कार्यालयाच्या आवारात आणून उभी करण्यात येतात. दंड किंवा कर न भरलेल्या वाहनांचा कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून लिलाव केला जातो. सध्या मुख्य कार्यालयाच्या आवारात अनेक दुचाकी, बस, रिक्षा, टेम्पो, कार, ट्रक आदी अनेक वाहने आहेत. अनेक वाहने गंज चढून सडू लागली आहेत. काहींचे टायर, काचा फुटल्या आहेत. या वाहनांनी आवारातील मोठी जागा व्यापली आहे. या परिसरात इतर गाड्याही उभ्या केल्या जातात. यामुळे नागरिकांना आवारात गाड्या उभ्या करण्यासही जागा मिळत नाही. महिनोन् महिने चालणाऱ्या कायदेशीर प्रक्रियेमुळे अनेक वाहने गंज चढून सडतात. तसेच दररोज हजारो नागरिक आपली वाहने घेऊन कार्यालयात विविध कामांसाठी येत असतात.
त्यांनाही जप्त केलेल्या वाहनांचा अडथळा ठरत आहेत. फुलेनगर कार्यालयाच्या आवारातही अशीच स्थिती आहे. रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास यातील एका वाहनाने अचानक पेट घेतला. त्यानंतर आजूबाजूची वाहने पेटली. अग्निशमन दलाला याबाबत दुपारी १२.४५ वाजता माहिती मिळाली. त्यानंतर येरवडा येथील अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी आली. काही मिनिटांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. तोपर्यंत दहा वाहनांना आगीचा विळखा पडला होता. त्यात चार मोटारी, चार बस, एक टेम्पो आणि एका डम्परचा समावेश आहे. दोन बस व टेम्पो जळून खाक झाल्याची माहिती येरवडा अग्निशमन केंद्राचे प्रमुख सुभाष जाधव यांनी दिली.
फुलेनगर कार्यालयाच्या आवारामध्ये दारूच्या बाटल्या पडलेल्या दिसून येतात. तिथे कार्यालयाला रविवारी सुटी असली तरी परिसरातील नागरिकांचा वावर असतो. रात्रीच्या वेळी तिथे मद्यपी येतात परंतु, त्याकडे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा आहे. त्यांच्यापैकीच कुणीतरी पेटती बिडी किंवा सिगारेट गवतावर फेकल्याने आग लागलेली असू शकते, अशी शक्यता अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
रविवार असल्याने कार्यालयाचे कामकाज बंद होते. त्यामुळे आवारात इतर वाहने तसेच नागरिकही नव्हते. कामकाजाच्या दिवशी दोन्ही कार्यालयांच्या आवारात मोठी गर्दी असते. त्यामुळे रविवारऐवजी इतर दिवशी अशी घटना घडल्यास वाहनांचीही मोठी हानी होण्यासोबत जीवितहानी होण्याचाही धोका आहे. ही वाहने अनेक महिन्यांपासून उभी असल्याने आरटीओच्या मुख्य कार्यालयाला अवकळा आली आहे. कायदेशीर प्रक्रियेमुळे ही वाहने हलविता येत नसल्याचे आरटीओ अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच आरटीओकडे जप्त केलेली वाहने उभी करण्यासाठी दुसरी जागाही नसल्याने पर्याय नाही. दरम्यान, याविषयी आरटीओ अजित शिंदे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.
याबाबत पुणे रिक्षा फेडरेशनचे बापू भावे म्हणाले, ''अनेक महिने वाहनांचा लिलावच केला जात नाही. त्यामुळे जप्त केलेल्या वाहनांची संख्या वाढत चालली आहे. फुलेनगर कार्यालयाच्या आवारात मद्यपी येत असतात. त्यावर नियंत्रण नाही. त्यामुळे ही घटना घडलेली असू शकते. वाहनांचा लिलाव वेळेत केल्यास अशी परिस्थिती निर्माण होणार नाही. काही ठराविक मुदतीत कर किंवा दंड न भरल्यास त्या वाहनांचा तातडीने लिलाव करायला हवा. परंतु, आरटीओ अधिकाऱ्यांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.''
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.