आजकाल बाप पळवायची स्पर्धा !
#सासवड
राज्याचे माजी मुख्यमंत्री व उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आपला बाप पळवला असल्याचे विधान केले होते. या विधानाची री ओढत आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही आजकाल बाप पळवायची स्पर्धा लागली असल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या की, आजकाल बाप पळवायची स्पर्धा लागली आहे. शरद पवार हे माझे वडील आहेत. त्यांचे विचार घ्यायचे असतील तर ते घेऊ शकता पण ते माझेच वडील आहेत, एवढे लक्षात ठेवा. सुळेंनी हा असा टोला स्वपक्षातील नेत्यांना तर लगावला नाही ना, याची चर्चा रंगली आहे.
सत्यशोधक समाज स्थापनेस १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पुरंदर तालुक्यातील सासवडमध्ये सत्यशोधक समाज परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाला शरद पवार, सुप्रिया सुळे, बाबा आढाव, हरी नरके उपस्थित होते. आजकाल वडील पळवायची स्पर्धा लागली आहे. शरद पवार हे माझे वडील आहेत. त्यांचे विचार घ्यायचे असतील तर ते घेऊ शकता पण ते माझेच वडील आहेत. अजितदादा पण दौऱ्यासाठी बाहेर जातो आणि मी पण बाहेर जाते. मी रात्री दीड वाजता आले तरी मला कुणी म्हणत नाही की तू संध्याकाळी ७ वाजता ये म्हणून. जेवढा दादाला अधिकार आहे तेवढाच मला आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. आज मोर्चे निघतात आणि ते सांगतात की, कोणी कोणासोबत लग्न करायचे. एक दिवस धर्मासाठी द्या म्हणतात. लव्ह जिहादचा अर्थ कोणत्याही डिक्शनरीत नाही. कोणी काय घालावं? काय बोलावं ? कुणाशी लग्न करावे? हा ज्याचा-त्याचा अधिकार आहे. लग्न कुणाशी करायचं हे जर कुणी मला सांगणार असेल तर मी त्याला विरोध करणारच. एखाद्या सिनेमावर एवढं वादळ उठू शकते. आमच्यापेक्षा आमच्या आधीची पिढी जास्त प्रगल्भ आहे हे माझं ठाम मत आहे, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
feedback@civicmirror.in
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.