आधार क्रमांक सांगत करतात ‘निराधार’
रोिहत आठवले
TWEET@RohitA_mirror
तुमच्या नावाने परदेशात पार्सल पाठविण्यात आले असून, त्यामध्ये काही अवैध वस्तूंचा समावेश होता. या प्रकरणी पोलीस कारवाई सुरू असून, तुमचा त्यात अप्रत्यक्ष सहभाग असल्याचे दिसून येते. यामुळे तुम्ही मुंबई, अंधेरी येथे या... अशा स्वरूपाचे फोन सध्या आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या अभियंत्यांना येत आहेत. गेल्या काही दिवसांतील अशा प्रकारच्या तीन घटनांमध्ये आधार कार्डचा क्रमांक सांगत फसवणुकीचा मार्ग वापरल्याचे दिसून येते. अशाच प्रकारे एका अभियंता तरुणीची आर्थिक फसवणूक केली आहे. गेल्या महिनाभरात सायबर ठगांनी ही नवी मोडस ऑपरेंडी वापरत लोकांना फसविण्यास सुरुवात केली आहे.
ऋतिका किरण हेगे (वय २७, सध्या रा. हिंजवडी फेज १) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. या प्रकरणी राहुल कुमार आणि पोलीस असल्याचे सांगणाऱ्या अजयकुमार बन्सल या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच स्मिता जोशी आणि अभिषेक काळे या दोघांनाही अशाच प्रकारे गेल्या महिनाभरात फोन आले आहेत.
९८ हजार उकळले
ऋतिका यांना फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात ९ आकडी नंबरवरून एक फोन आला. राहुल कुमार या नावाने फोन करणाऱ्याने तो कुरिअर कंपनीतून बोलत असल्याचे ऋतिका यांना सांगितले. तुम्ही तैवान येथे एक पार्सल पाठविले होते आणि ते तैवान कस्टम डिपार्टमेंटने अडविले आहे. या पार्सलमध्ये काही आक्षेपार्ह वस्तू असल्याने तुमच्यावर अंधेरी, मुंबई येथे सायबर क्राईम अंतर्गत गुन्हा दाखल केल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर राहुल नावाच्या व्यक्तीने हा फोन पुढील कारवाईसाठी अंधेरी ईस्ट सायबर पोलिसांकडे ट्रान्स्फर करीत असल्याचे सांगितले. फोन होल्डवर असताना बन्सल कुमार नावाच्या व्यक्तीने अंधेरी ईस्ट सायबर पोलीस ठाण्यातून बोलत असल्याचे सांगत ऋतिका यांना धमकावले. तुमच्यावर कारवाई होणार असून ज्या लोकांना पार्सल पाठविण्यात आले त्यांना त्यामधून आर्थिक फायदा झाला. त्या फायद्यातील मोबदला म्हणून २० टक्के रक्कम तुमच्या बँक खात्यात येत असल्याचेही ऋतिका यांना सांगण्यात आले. तैवान देशात कोणत्या स्वरूपाचे पार्सल पाठविले आणि त्यातून फायदा म्हणून आतापर्यंत किती रक्कम आली हे तपासण्याच्या नावाखाली ऋतिका यांच्याकडून ९८ हजार रुपये घेण्यात आले. कालांतराने हा फोन कॉल खोटा असल्याचे लक्षात आल्यावर ऋतिका यांनी हिंजवडी पोलिसांकडे धाव घेतली.
ऋतिका यांना फोन येण्याच्या दोन दिवस आधी स्मिता जोशी या तरुणीला देखील राहुल कुमार याने फोन करून कुरिअर कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले होते. तसेच तुमच्या आधार कार्ड आणि अन्य कागदपत्रांचा वापर करून टांझानिया या देशात पार्सल पाठविण्यात आले असून, ते टांझानिया कस्टम डिपार्टमेंटने अडविले आहे. त्यामध्ये तीन बोगस पासपोर्ट आणि अन्य काही अवैध वस्तू आढळून आल्या आहेत. त्यामुळे फोन अंधेरी पोलिसांकडे ट्रान्स्फर करीत असल्याचे सांगितले. त्यानंतर स्मिता पाटील नाव सांगणाऱ्या महिलेने ती पोलीस निरीक्षक असून, पुढील कारवाईसाठी तुम्ही अंधेरी पोलीस स्टेशनमध्ये या असे बजावले. तसेच कारवाई टाळायची असल्यास एक व्हॉट्सॲप नंबर देऊन त्यावर कॉल करण्यास सांगितले होते. परंतु, जोशी यांनी सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने त्यांना दुसऱ्यांदा फोन आला नाही. दरम्यान, अभिषेक यांना देखील तंतोतंत वरील संभाषण करणारा फोन आला. अभिषेक यांना त्यांनी टर्की येथे पार्सल पाठविल्याचे सांगण्यात आले होते.
या तिन्ही घटनांमध्ये पोलिसांना प्राथमिक तपासात एक साम्य आढळून आले आहे. या तिघांना फसवणूक करण्यासाठी त्यांच्या आधार कार्डचा क्रमांक सांगत विश्वास संपादन केला होता. तसेच या तिघांनी तात्पुरते निवासस्थान बदलताना आपली काही कागदपत्र काही व्यक्तींना दिल्याचे आता समोर येत आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.
चौकसपणा कामी आला
मी अनेक वर्षात मुंबईत गेली नसल्याने मला या फोनबाबत शंका आली. मात्र, माझे पूर्ण नाव, पत्ता, आधार कार्डची माहिती फोन करणाऱ्याला असल्याने सुरुवातीला मला तो फोन खरा वाटला. त्यामुळे मी घाबरले होते. पण मी स्थानिक पोलिसांना भेटून तुम्हाला फोन करते, असे सांगितल्याने मला परत फोन आला नसल्याचे अभियंता असलेल्या स्मिता जोशी यांनी सांगितले.
फोन करणाऱ्या व्यक्तीने अंधेरी पोलिसांना कॉल ट्रान्स्फर केल्याने शंका आली. कुरिअर कंपनीतून बोलणारा व्यक्ती पोलिसांना पुढील संभाषण करण्यास सांगत असल्याने मी टर्की पोलिसांना फोन करायला सांगा असे सांगितल्याने मला परत फोन आला नाही. मात्र, आमची सर्व माहिती फोन करणाऱ्या व्यक्तीकडे होती. त्यामुळे लोक फसत असल्याचे अभियंता असलेले अभिषेक काळे म्हणाले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.