रामा कांबळे आणि महेश कांबळे
रोहित आठवले
rohit.athavale@civicmirror.in
TWEET@RohitA_mirror
दूरच्या नातेवाईकाने विनयभंग केला म्हणून पोलिसांनी ठावठिकाणा शोधून त्याला अटक केल्यावर आडनाव आणि गावाच्या नाम साधर्म्यातून २७ वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटल्याचा प्रकार समोर आला आहे.
पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने ही कामगिरी केली असून, मागील २७ वर्षांपासून नाव बदलून राहणाऱ्या ६६ वर्षीय आरोपी नातलगाला अटक करण्यात आली. रामा कोंडिबा बनसोडे (वय ६६, सध्या रा. उर्सेगाव, मावळ) असे २७ वर्षांपूर्वी पत्नी सुशीला रामा कांबळे हिच्या खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली. रामाने १९९५ मध्ये वर्षाच्या सुरुवातीला सुशीलाच्या छातीत दगडी उखळ मारून तिचा निर्घृण खून केला होता.
रामाचा नातेवाईक असलेल्या महेश भीमराव कांबळे (रा. दापोडी) याने एका महिलेचा विनयभंग केला. या प्रकरणी विनयभंग आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांन्वये गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून महेश फरार झाला होता. त्यामुळे गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकातील सहायक फौजदार शिवाजी कानडे, हवालदार फारुक मुल्ला, प्रमोद हिरळकर, मारुती जयभाये हे महेश याचा शोध त्याच्या मूळ गावी कोळणूर पांढरी, तालुका लोहार या उस्मानाबाद जिल्ह्यात शोध घेत होते.
दरम्यान, २७ वर्षांपूर्वी याच गावातील एक आरोपी दापोडी-भोसरी परिसरात खून करून अद्याप बेपत्ता असल्याचे सहायक फौजदार कानडे यांच्या लक्षात आले.
त्यामुळे त्यांनी महेशला अटक केल्यावर गावात रामाबाबत चौकशी केली. तेव्हा रामा आणि महेश हे नातेवाईक असल्याचे त्यांना गावातील लोकांनी सांगितले. मात्र, महेश रामाबाबत अधिक माहिती सांगत नव्हता. तेव्हा त्याच्या गावातीलच नातेवाईकांना विचारणा केली असता, रामा मूळ गावी अचानक कधी तरी येतो. त्याने एका मुक्या महिलेशी काही वर्षांपूर्वी विवाह केला असून, त्याला तीन मुली आहेत, अशी माहिती मिळाली.
दरम्यान, रामा हा उर्से गावात एका वीटभट्टीवर काम करीत असल्याचे गावातील एका महिलेने तपास पथकाला सांगितले. युनिट एकचे निरीक्षक ज्ञानेश्वर
काटकर यांना ही माहिती कळविण्यात आली. काटकर यांनी दुसरे पथक पाठवून रामाला अटक केली.
रामा याचे खरे नाव रामा पारप्पा कांबळे असे असून, त्याने रामा कोंडिबा बनसोडे असे बदलून घेतल्याचे तपासात उघड झाले आहे. तसेच त्याने बोगस नावाचे आधारकार्ड बनवून घेतले असून, तो याच नावाने मागील २७ वर्षांपासून ओळख लपवून पिंपरी-चिंचवड आणि गावात येऊन-जाऊन राहात असल्याचे उघड झाल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिली.