कामगाराचा घरातील ४ लाखाच्या दागिन्यावर डल्ला
पुण्यातील कल्याणीनगर येथील एका उच्चभ्रू सोसायटीमधील नोकरदार दाम्पत्यांच्या घरी लहान मुलाचा सांभाळ करण्यासाठी आलेल्या कामगारानेच ४ लाखाच्या दागिन्यांची चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र, पोलिसांनी अवघ्या १२ तासातच चोरट्याला अटक केली आहे.
अविनाश मल्लेश तुपेकर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. येरवडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश तुपेकर हा कल्याणीनगर येथील एका उच्चभ्रू सोसायटीमधील नोकरदार दाम्पत्यांच्या घरी लहान मुलाचा सांभाळ करण्यासाठी येत होता. या दरम्यान, त्याने घरातील ३ लाख ६२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरले.
याबाबत येरवडा पोलिसांना माहिती मिळताच अविनाश तुपेकरला अवघ्या १२ तासातच विमाननगर येथून ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असताना सदरचा चोरी एका अल्पवयीन मुलाच्या साथीने केल्याची कबूली दिली. येरवडा पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.