महिलेची भररस्त्यात हत्या
पुणे शहरातील खडकी येथील दारूगोळा कारखान्यात काम करणाऱ्या महिलेची भररस्त्यात चाकू भोसकून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. रजनी बैकल्लू असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे हत्येनंतर आरोपी पसार झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४४ वर्षीय रजनी बैकल्लूच्या पतीचे १० वर्षापुर्वीच निधन झाले होते. तिला दोन मुले आहेत. ती खडकी येथील दारूगोळा कारखान्यात कामाला होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून रजनी एका व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे बोलले जात आहे.
सोमवारी सकाळी रजनी कामावर जात होती. खडकी स्टेशनजवळ आली असता दुचाकीवरून आलेल्या दोघांनी तिला अडवले. त्यानंतर महिलेच्या पोटात, खांद्यावर आणि मानेवर चाकू सपासप वार केले. त्यानंतर महिलेला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. दरम्यान, रिलेशनशिपमधील संबंधि बिघडल्यामुळे महिलेची हत्या झाल्याचे बोलले जात आहे. सध्या पोलिस आरोपींचा तपास करत आहेत.