Rape : तपासणीसाठी आलेल्या महिलेवर डॉक्टरने केला बलात्कार

तपासणीसाठी आलेल्या रुग्ण महिलेवर डॉक्टरनेच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना कात्रज भागात घडली आहे. या प्रकरणी पीडीत रुग्ण महिलेकडून पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी संबंधित आरोपी डॉक्टरला अटक केली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Sat, 29 Apr 2023
  • 01:53 am
तपासणीसाठी आलेल्या महिलेवर डॉक्टरने केला बलात्कार

तपासणीसाठी आलेल्या महिलेवर डॉक्टरने केला बलात्कार

भारती विद्यापीठ पोलिसांकडून आरोपीस अटक

#कात्रज

तपासणीसाठी आलेल्या रुग्ण महिलेवर डॉक्टरनेच  बलात्कार केल्याची धक्कादायक घटना कात्रज भागात घडली आहे. या प्रकरणी पीडीत रुग्ण महिलेकडून पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी संबंधित आरोपी डॉक्टरला अटक केली आहे.

डॉ. अमित आनंदराव दबडे (वय २९, रा. आंबेगाव खुर्द) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका ३२ वर्षीय पीडीत महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. डॉ. दबडे यांचा कात्रज भागातील मांगडेवाडी भागात कल्पनानंद क्लिनिक नावाचा दवाखाना आहे. पीडित महिला डॉ. दबडे यांच्या रुग्णालयात तपासणीसाठी आली होती. त्या वेळी त्यांची ओळख झाली. 

डॉ. दबडे यांनी महिलेचा मोबाइल क्रमांक घेतला. त्यानंतर डॉ. दबडे यांनी त्यांना गोड बोलून पुन्हा रुग्णालयात बोलावले. त्यांनतर डॉ. दबडे यांनी मला धमकावले आणि माझ्यावर बलात्कार केला, असे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. डॉ. दबडे यांनी आपला पाठलाग करून आपल्याला त्रास दिला, असेदेखील महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील साहाय्यक पोलीस निरीक्षक तावडे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

तपासणीसाठी आलेल्या महिलेचा विनयभंग किंवा बलात्कार डॉक्टरांनी केल्याच्या घटना यापूर्वीदेखील घडल्या आहेत. त्यासाठी दवाखान्यांमध्ये सीसीटीव्ही लावण्याची मागणीदेखील वेळोवेळी करण्यात आली आहे. पोलिसांसह स्थानिक प्रशासनाने यामध्ये वेळीच लक्ष घालण्याची गरज आहे.

feedback@civicmirror.in 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story