विमाननगर भागात सराईत दुचाकी चोर अटकेत, अडीच लाखांच्या ५ दुचाकी जप्त
#पुणे
विमाननगर भागातून दुचाकी चोरणाऱ्या एका चोरट्याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून अडीच लाखांच्या पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहे. योगेश संजय गालीकर (वय २६, रा. विजयनगर, दिघी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
गेल्या काही दिवसांपासून विमानतळ भागात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढलेले असल्याने पोलीस पथक विमाननगर भागात वाहन चोरांचा माग काढत होते. त्यावेळी विमानतळाजवळील लोहगाव भागात दुचाकी चोरटा थांबला असल्याची माहिती विमानतळ सहायक निरीक्षक विजय चंदन आणि पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने सापळा लावून आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीत त्याच्याकडील दुचाकीही चोरीची असल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी गालीकर याला अटक केली.
सखोल चौकशीत त्याने शहर परिसरात विविध ठिकाणी दुचाकी चोरीचे गुन्हे केल्याचे उघडकीस आले. त्याने विमानतळ भागातून चार दुचाकी, तसेच दिघीतून एक दुचाकी अशा पाच दुचाकी चोरल्याची कबुली पोलिसांना दिली. गालीकर सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध गुजरातमधील सूरत शहरातही गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
गालीकरकडून पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे, सहायक पोलीस निरीक्षक विजय चंदन, अविनाश शेवाळे, अंकुश जोगदंडे, नाना कर्चे, दादासाहेब बर्डे, योगेश थोपटे, सचिन जाधव आदींनी ही कारवाई केली आहे.