Terrorist : ग्राफिक डिझायनरच्या चेहऱ्याआड दहशतवादी

राष्ट्रीय तपास यंत्रणेने प्रत्येकी पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केलेल्या दोघा संशयित दहशतवाद्यांना पकडून पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे. कोथरूड पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी हे दहशतवादी वाहन चोरीच्या प्रयत्नात असताना त्यांना पकडले. आता त्यांचा पुण्यात येण्याचा मूळ उद्देश तपासला जात आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Rohit Athavale
  • Wed, 19 Jul 2023
  • 11:29 pm
ग्राफिक डिझायनरच्या चेहऱ्याआड दहशतवादी

ग्राफिक डिझायनरच्या चेहऱ्याआड दहशतवादी

दीड वर्ष पुण्यात वास्तव्य, राजस्थानातील स्फोटक प्रकरणात फरार, कोथरूड पोलिसांची सतर्क कामगिरी

रोहित आठवले

rohit.athavale@civicmirror.in

TWEET@RohitA_mirror

राष्ट्रीय तपास यंत्रणेने प्रत्येकी पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केलेल्या दोघा संशयित दहशतवाद्यांना पकडून पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे. कोथरूड पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी हे दहशतवादी वाहन चोरीच्या प्रयत्नात असताना त्यांना पकडले. आता त्यांचा पुण्यात येण्याचा मूळ उद्देश तपासला जात आहे.

 इम्रान खान आणि मोहम्मद युनुस अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. गेल्या पंधरा ते अठरा महिन्यांपूर्वी इम्रान आणि मोहम्मद हे पुण्यात आले होते. प्रींटिंगचा व्यवसाय करणाऱ्याकडे हे दोघे ग्राफिक डिझायनर म्हणून काम करीत होते. परंतु, त्यांचा पुण्यात येण्याचा उद्देश हा भिन्न असून, नव्याने देशविघातक गोष्टी करण्याचा या दोघांचा प्रयत्न असल्याचा संशय पुणे पोलिसांना आहे.

 या दोघांवर राष्ट्रीय तपास यंत्रणेने प्रत्येकी पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केलेले आहे. दोघेजण राजस्थानच्या चित्तोडगडमध्ये मार्च २०२२ मध्ये सापडलेल्या स्फोटकाच्या प्रकरणात फरार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 कोथरूड भागात रात्र गस्तीवर असलेले पोलीस कर्मचारी प्रदीप चव्हाण आणि अमोल नजन या दोघांना इम्रान आणि मोहम्मद हे दुचाकी चोरीचा प्रयत्न करीत असल्याचे लक्षात आले. या दोघांना रंगेहाथ पकडल्यावर त्यांच्याकडे प्राथमिक चौकशी केली. यावेळी इम्रान आणि मोहम्मदबाबत संशय वाटल्याने अधिकाऱ्यांना बोलावून सखोल चौकशी केली. या चौकशीत अनेक धक्कादायक बाबींचा उलगडा झाला आहे.

 राजस्थानमधील चित्तोडगडमध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटके सापडली होती. त्यावेळी स्फोटकांना कनेक्टर, पेन्सिल सेल, धातूच्या तारा जोडून बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा प्रयत्न मार्च २०२२ मध्ये उघडकीस आला होता. एका कारमध्ये हे सर्व तपासणीदरम्यान आढळून आले होते. या प्रकरणी राजस्थानातील निम्बाहेडा पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याच्या तपासात इम्रान आणि मोहम्मद यांचे नावे पुढे आल्यानंतर त्यांचा शोध घेतला जात होता.  इम्रान आणि मोहम्मद या दोघांना पकडल्यानंतर त्यांनी सांगितलेली नावे आणि त्यांचे मोबाईल क्रमांक ट्रू कॉलरवर चेक केल्यावर आलेली नावे यात तफावत होती. दोघांनी हिंदू नावे सांगितली होती. ट्रू कॉलरवर मुस्लीम नावे आली होती. त्यामुळे कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक हेमंत पाटील, फौजदार प्रवीण कुलकर्णी यांना घटनास्थळी बोलावून इम्रान आणि मोहम्मद या दोघांना ताब्यात घेण्यात आले.

 ते राहात असलेल्या कोंढवा भागातील फ्लॅटवर फौजदार कुलकर्णी आणि कर्मचारी बाला रफी शेख, अनिकेत जमदाडे, ज्ञानेश्वर पांचाळ, वैभव शितकाल यांना पाठविण्यात आले. तेव्हा या फ्लॅटमध्ये एक जिवंत काडतूस, चार मोबाईल, एक लॅपटॉप, इस्लामिक साहित्य आढळून आले. या दोघांकडे चौकशी केली असता मिळणाऱ्या माहितीवरून अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. त्यावेळी हे दोघे राष्ट्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर असलेले आणि फरार संशयित दहशतवादी असल्याचे उघड झाले.

 कोथरूड पोलिसांनी केलेल्या या कामगिरीची माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणांना देण्यात आली. त्यानंतर एनआयएचे पथक दिल्ली येथून विशेष विमानाने पहाटे पुण्यात दाखल झाले आहे. एनआयए, एटीएस पुणे, गुप्तचर विभाग, गुन्हे शाखा आणि कोथरूड पोलीस संयुक्तपणे आणि विविध पातळ्यांवर या दोघांची चौकशी करीत आहेत. चोरीच्या वाहनांचा वापर करून, बॉम्बस्फोट घडवून आणल्याची काही उदाहरणे यापूर्वी देशात तपासानंतर समोर आली आहेत. त्यामुळे पुणे शहरातील उच्चभ्रू आणि शांत परिसर अशी ओळख असलेल्या कोथरूड भागातून वाहन चोरी करण्यामागे इम्रान आणि मोहम्मद यांचा उद्देश प्राथमिक चौकशीतून समोर आलेला नाही. त्याचबरोबर या दोघांनी राजस्थानमधील स्फोटक प्रकरणानंतर पसार झाल्यावर पुण्यात येण्याचे का ठरविले. त्यांना पुण्यात आश्रय कोणी दिला, घर भाडेतत्त्वावर कोणी मिळवून दिले. त्यांचे पुण्यातील अन्य ओळखीचे आणि मदत करणारे कोणी होते का, या सगळ्या प्रश्नांचा उलगडा अद्याप झालेला नाही. या सगळ्या गोष्टींचा तपास कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक हेमंत पाटील यांच्याकडून केला जात आहे. दोघांची २५ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्याचे आदेश शिवाजीनगर कोर्टाने दिले आहेत.  दरम्यान, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदीप कर्णिक यांनी पोलीस कर्मचारी प्रदीप चव्हाण आणि अमोल नजन यांचे कौतुक करून सत्कार केला आहे. दुसरीकडे दिवसभर एनआयएने जाहीर केलेली बक्षिसाची रक्कम चव्हाण आणि नजन यांना दिली जावी अशी मागणी करणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावरून व्हायरल होत होत्या. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story