Pune traffic bhumkar chowk : चक्राकार वाहतुकीवर शिक्कामोर्तब

आयटी पार्क हिंजवडी परिसरातून महामार्गावर येताना भूमकर चौकात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात करण्यात आलेल्या चक्राकार वाहतुकीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करत सोमवारी (७ ऑगस्ट) परिसरातील वाहतूक वळवण्याबाबत अंतिम आदेश देण्यात आले आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Rohit Athavale
  • Tue, 8 Aug 2023
  • 12:09 pm
चक्राकार वाहतुकीवर शिक्कामोर्तब

चक्राकार वाहतुकीवर शिक्कामोर्तब

आयटी पार्क हिंजवडी परिसरातून महामार्गावर येताना भूमकर चौकात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा; नोकरदारांना दिलासा

रोहित आठवले

rohit.athavale@civicmirror.in

TWEET@RohitA_mirror

आयटी पार्क हिंजवडी परिसरातून महामार्गावर येताना भूमकर चौकात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात करण्यात आलेल्या चक्राकार वाहतुकीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करत सोमवारी (७ ऑगस्ट) परिसरातील वाहतूक वळवण्याबाबत अंतिम आदेश देण्यात आले आहेत. याबाबत स्थानिक व्यावसायिकांनी विरोध दर्शविला होता. त्यामुळे येथील आमदार, खासदारांना बोलावून हा बदल रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु, आयटी पार्कमधील वाहनचालकांना याचा फायदा होत असल्याने हा बदल कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी नागरिकांकडून हरकती-सूचना मागविण्यात आल्यानंतर निर्णय घेण्यात आला आहे.

मारुंजी वाय जंक्शन, भूमकर चौक, काळा खडक येथून हिंजवडी आयटी पार्कमध्ये जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे. तसेच, काळा खडक येथील चौकात अवजड वाहने वळण घेण्यासाठी येत असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा खोळंबा होतो. याबाबत पोलिसांनी तात्पुरत्या स्वरूपात बदल केले होते.

मारुंजी वाय जंक्शन येथील उजवीकडील यू टर्न बंद करून लक्ष्मी चौकाकडे जाणारी वाहतूक कस्तुरी चौकमार्गे विनोदे कॉर्नर येथून इच्छित स्थळी जाऊ शकते. मारुंजी वाय जंक्शन ते कस्तुरी चौक एकेरी वाहतूक करण्यात येत आहे. कस्तुरी चौकाकडून मारुंजी वाय जंक्शनकडे येणारी वाहतूक बंद करून ती कस्तुरी चौकातून विनोदे कॉर्नरमार्गे मारुंजी वाय जंक्शनकडे वळविण्यात आली आहे. ग्रामपंचायत आणि महापालिकेच्या सीमेवर असलेल्या हिंजवडी आयटीपार्कमध्ये वाहतूक कोंडीसह अन्य मूलभूत समस्यांची मोठी यादी आहे. महापालिकेच्या हद्दीतील मोठे रस्ते तर हिंजवडी ग्रामपंचायत हद्दीतील अरुंद रस्त्यांमुळे वाहनांच्या रांगा येथे कायमच पाहायला मिळतात.

सध्या मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्याचे काम हिंजवडीत सुरू आहे. आयटी पार्क हिंजवडीमधून बाहेर येण्यासाठी असलेल्या रस्त्यांपैकी एक रस्ता मेट्रोच्या कामामुळे जवळपास निम्मा राहिला आहे, तर लक्ष्मी चौक, कस्तुरी चौक, मारुंजी चौक आणि शिवाजी चौक हिंजवडीमधून भूमकर चौकात येणाऱ्या वाहनांच्या एक-दीड किलोमीटरपर्यंत रोज रांगा लागत होत्या. यामध्ये प्रामुख्याने भूमकर चौकातून कस्तुरी चौकाकडे (हिंजवडीच्या दिशेने) जाताना एका शेतकऱ्याने रस्त्याची एक पूर्ण बाजू मोबदला किती मिळावा या वादातून अडवून ठेवली आहे. विशेष म्हणजे, महापालिका-ग्रामपंचायत, लोकप्रतिनिधी यांना गेल्या १०-१५ वर्षात हा वाद मिटविता आला नव्हता. तो आता संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.

दरम्यान, पुणे-बंगळुरू महामार्गावर हिंजवडी, भूमकर चौक आणि त्यापुढे रावेत-किवळेच्या दिशेने जाताना सेवा रस्त्यावर असलेल्या अंडरपासमध्ये खड्डे आणि गटार तुंबत असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. आठ दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे तीन ते चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा या भागात लागल्या होत्या. याबाबत ट्विटरसह प्रत्यक्षपणे नागरिकांनी पोलिसांना दोष देत यावर तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली होती, तर रस्ते दुरुस्ती, गटार, पावसाचे पाणी निचरा होण्यासाठी ड्रेनेज, पुरेसे रस्ते या सुविधा महापालिकेकडून करणे अपेक्षित असताना त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झालेले दिसून येते.

दरम्यान, या सगळ्या प्रकारानंतर पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत तत्काळ तोडगा काढण्याच्या सूचना केल्या होत्या. तसेच महापालिका, महामार्ग रस्ते बांधणी विभाग आणि अन्य विभागांशी समन्वय ठेवून उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पोलीस सहआयुक्त डॉ. संजय शिंदे, अतिरिक्त आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे, वाहतूक विभागाचे साहाय्यक आयुक्त विठ्ठल कुबडे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी करून भूमकर चौकातील वाय जंक्शन येथे एकेरी वाहतूक करण्याचे नियोजन केले आहे.

पुण्याकडून येणाऱ्या वाहनांना भूमकर चौकातून डांगे चौकाच्या दिशेने जाण्यासाठी ७०० मीटर पुढे कस्तुरी चौकातून उजवीकडे वळून विनोदे चौकातून पुन्हा उजवीकडे वळून जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर भूमकर चौक ते कस्तुरी चौक-विनोदे चौक हा रस्ता दोन्ही दिशेने एकेरी करण्यात आला आहे. त्याचबरोबर हिंजवडीकडून फेज १ व २ आणि मारुंजी फेज ३ कडून येणारी वाहतूक विनोदे चौकाच्या दिशेने वळविण्यात आली आहे. त्यामुळे सगळीकडून येणारी वाहने विनोदे चौकात अडकून पडू नये यासाठी इंटेलिजंट स्मार्ट सिग्नल सीस्टिम (स्वयंचलित सिग्नल यंत्रणा) उभारण्यात आली आहे. यासाठी येथे बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे कोणत्या दिशेने किती वाहने आली आहेत, ते पाहून त्या दिशेचा सिग्नल प्रथम सुरू होत आहे. त्यामुळे वाहतूक थांबून राहण्याचे प्रकार गेल्या महिन्यांपासून बंद झाले आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story