लग्नातील उरलेल्या गुलाबजामसाठी तुफान हाणामारी
लग्न समारंभ म्हणले की गोडधोड जेवण आलेच. परंतु याच लग्न समारंभात गोडधोड जेवणावरून दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार पुण्यातील हडपसर भागामध्ये २२ एप्रिलला पार पडलेल्या एका लग्न समारंभात घडला.
हडपसर भागातील शेवाळवाडी हद्दीमधील एका मंगल कार्यालयामध्ये विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, लग्न समारंभ संपल्यानंतर उरलेले जेवण घरी घेऊन जाण्यासाठी वर पक्षाकडील काही लोक व्यवस्थापक असणाऱ्या गुप्ता यांच्याकडे आलेली होती. यावेळी वर पक्षातील मंडळी उरलेले जेवण डब्यामध्ये भरत असताना गुप्ता यांनी गुलाबजामुन घरी घेऊन जाऊ नका ते उद्याच्या कार्यक्रमासाठी आहेत, असे सांगितले.
याच कारणावरून वर पक्षाकडील मंडळींना राग अनावर झाला आणि रागाच्या भरात गुप्ता यांना मारहाण केली. यानंतर गुप्ता यांच्यासोबत असलेल्या लोकांनी देखील आक्रमक पवित्रा घेतला. यामुळे दोन गटात तुफान राडा झाला.