किरकोळ वादातून रिक्षा चालकाची पीएमपी चालकाला बेदम मारहाण
#पुणे
पार्किंगच्या किरकोळ कारणावरून रिक्षा चालक आणि पीएमपी बस चालकातील वादाचे रूपांतर बेदम मारहाणीत झाले असून या प्रकरणी रिक्षा चालकावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बुधवार, २ ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास आंबेठाण चौक, चाकण येथे झाली.
मोहन अर्जुन माळेकर (वय ५४, रा. दिघी) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सचिन (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार फिर्यादी माळेकर हे पीएमपी बस चालक असून पिंपरी ते चाकण या मार्गावर ते नेमणुकीस आहेत.
बुधवारी रात्री आंबेठाण चौकात रिक्षा स्टॅन्डवर बस थांबवली. यामुळे रिक्षा चालक संतापला आणि त्यांने माळेकर यांना बेदम मारहाण केली. यामध्ये ते जखमी झाले आहेत. पोलिसांनी रिक्षा चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून चाकण पोलीस तपास करीत आहेत.
एटीएममधून सहा हजार लंपास
एटीएम मशीनच्या शटरमध्ये बदल घडवून ६ हजार लांबवणाऱ्या उत्तर प्रदेशातील दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. धर्मेंद्र श्रीशिवलाल सरोज (वय ३०), सोनूकुमार जगदेव सरोज (वय २८, रा. दोघेही प्रतापगड, उत्तर प्रदेश) यांना अटक केली आहे. या प्रकरणी रामचंद्र जाधव (वय ३८, रा. अप्पर डेपो, बिबवेवाडी) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, धर्मेंद्र आणि सोनूकुमार यांनी धनकवडी येथील महाराणा प्रताप चौकातील एचडीएफसी बँकेच्या एटीएम मशीनला जेथून पैसे बाहेर येतात, तेथे लोखंडी पट्टी लावून शटरमध्ये बदल करत ६ हजार लांबवले होते. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक धिरज गुप्ता करत आहेत.
कंटेनरच्या धडकेने मुलाचा मृत्यू
भरधाव कंटेनरने धडक दिल्याने एका ११ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. ही घटना कोलवाडी ते थेऊर फाटा रोडवरील चिंतामणी चौकात घडली. रामा पवार (वय ११, रा. अलिफनगर, थेऊर) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. या प्रकरणी विठ्ठल पवार (वय ३७, रा. अलिफनगर, थेऊर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कंटेनर चालक सुनील कुमार तेजबहादूर यादव (वय ३८, रा. मधय्या, जि. सुलतानपूर, उत्तर प्रदेश) याला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना १ ऑगस्ट रोजी दुपारी साडे बारा ते १ च्या दरम्यान झाली. रामा पवार हा सायकलवरून थेऊर गावातील चिंतामणी मंदिराकडे जाणाऱ्या चौकात रस्ता ओलांडत होता. यावेळी कोलवाडी ते थेऊरच्या दिशेने येणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिली. यात रामाचा मृत्यू झाला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विष्णू शिंदे करत आहेत.
feedback@civicmirror.in