लष्करातील निवृत्त सुभेदाराला एक कोटीला गंडवले

लष्करातून निवृत्त झालेल्या सुभेदारास सायबर चोरट्यांनी एक कोटी दहा लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत निवृत्त सुभेदारांनी फिर्याद दिली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Sun, 2 Apr 2023
  • 02:02 pm
लष्करातील निवृत्त सुभेदाराला एक कोटीला गंडवले

लष्करातील निवृत्त सुभेदाराला एक कोटीला गंडवले

लष्करातून निवृत्त कर्मचाऱ्यास दर्शक पसंतीवर पैसे कमावण्याचे दाखवले आमिष

#पुणे

लष्करातून निवृत्त झालेल्या सुभेदारास सायबर चोरट्यांनी एक कोटी दहा लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत निवृत्त सुभेदारांनी फिर्याद दिली आहे.

सायबर चोरट्यांनी निवृत्त सुभेदारास एक संदेश पाठवला होता. ज्यात त्यांनी समाजमाध्यमावर प्रसारित होणाऱ्या जाहिराती तसेच ध्वनिचित्रफितीला लाईक केल्यास, दर्शक पसंती दिल्यास त्यात मोठा नफा मिळेल, असे प्रलोभन लष्करातून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला दाखवले. प्रत्येक दर्शक पसंतीला पैसे देण्याचे आमिष दाखवून सुरुवातीला चोरट्यांनी तक्रारदार निवृत्त सुभेदारास काही रक्कम दिली. त्यामुळे तक्रारदारांचा सायबर चोरट्यांच्या बोलण्यावर विश्वास बसला. ते या आमिषाला बळी पडले. या व्यवसायात गुंतवणूक केल्यास दहा ते वीस टक्के नफा मिळेल, असे आश्वासन देत चोरट्यांनी त्यांना आपल्या जाळ्यात ओढले.

सायबर चोरट्यांनी त्यांच्याकडून वेळोवेळी पैसे उकळले. तुम्हाला दिलेले उद्दिष्ट साध्य केल्यानंतरच बँक खात्यात तुमचा नफा असलेले पैसे जमा करण्यात येणार असल्याचे चोरट्यांनी सांगितले. निवृत्त सुभेदाराने चोरट्यांच्या खात्यात ऑनलाइन पद्धतीने एक कोटी दहा लाख रुपये जमा केले. ही रक्कम उभी करण्यासाठी त्यांनी नातेवाईकांकडून काही कर्जही घेतले होते. ही रक्कम त्यांनी चोरट्यांच्या हवाली केली. त्यानंतर बराच काळ उलटला तरीही आपल्या खात्यात कसलेच पैसे जमा झाले नसल्याने त्यांनी संबंधितांकडे विचारणा केली. मात्र त्यानंतरही त्यांना कोणता परतावा देण्यात आला नाही. आपली फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलीस निरीक्षक सावंत तपास करत आहेत. चोरट्यांनी पाच बँकातील १२ खात्यांत पैसे जमा करून घेतले असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

feedback@civicmirror.in

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story