'रस्त्याच्या राजां'ची अभिमानास्पद कामगिरी
गौरव कदम
मोहिमेसाठीचे टी-शर्ट, शिट्ट्या वाजवणे आणि वाहतूक पोलिसांना मदत करण्यासाठी नोंदवलेली आपली वेळ येण्याची वाटही न पहाता या तिघांनी वाहतूक पोलिसांना मदत केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (एसपीपीयू) वेगवेगळ्या विभागात शिकणाऱ्या तीन विद्यार्थ्यांनी 'सीविक मिरर', 'पुणे टाइम्स मिरर' आणि पुणे शहर वाहतूक विभागाच्या 'जरा देख के चलो' मोहिमेत सहभागी होत मंगळवारी सायंकाळी अतिशय वर्दळीच्या विद्यापीठ चौकात वाहतूक पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून वाहतुकीला शिस्त लावण्याचे काम केले.
या विद्यार्थ्यांच्या मते त्यांच्या या अभिनायानातील प्रत्यक्ष सहभागामुळे पुणे शहरातील वाहतुकीची समस्या नागरिकांच्या आणि वाहतूक पोलिसांच्या दृष्टीने समजून घेता आली. या तिघांनी रस्त्यावर थांबत बेशिस्त वाहनचालकांना वाहतुक नियमवालीचे धडे देण्याचा अनुभव तर मिळवलाच पण याशिवाय आपल्याला 'रस्त्यावरचे राजे' संबोधले जातेय, याचेही समाधानही मिळवले. या तिघांनी मंगळवारी पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी मदत केली तसेच एका रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा करून दिला. आम्हाला या मोहिमेत सहभागी झाल्याचा अभिमान वाटतो, पुणे शहराच्या वाहतूक व्यवस्थपणासाठी आम्ही जो काही खारीचा वाटा उचललाय, त्याचं आम्हाला मनोमन समाधान वाटत असल्याची भावना त्यांनी आमच्याकडे व्यक्त केली आहे.