फसवणुकीचा नवा प्लॅटफॉर्म, टेलिग्राम!

नोकरीच्या शोधात असणाऱ्या महिलेला टेलिग्राम ग्रुपद्वारे नोकरी आणि पैसे गुंतवायला लावत लाखोंचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सॲप मेसेजिंग आणि कॉलला पर्याय म्हणून टेलिग्रामचा वापर वाढला असतानाच ठगांकडून फसवणुकीसाठी ही याच टेलिग्रामचा वापर सुरू केला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Thu, 16 Feb 2023
  • 12:33 pm

फसवणुकीचा नवा प्लॅटफॉर्म, टेलिग्राम!

नोकरीच्या शोधात असलेल्या महिलेला विविध टास्क सांगून लाखोंचा गंडा, दोघींवर गुन्हा दाखल

रोिहत आठवले

rohit.athavale@civicmirror.in

TWEET@RohitA_mirror

नोकरीच्या शोधात असणाऱ्या महिलेला टेलिग्राम ग्रुपद्वारे नोकरी आणि पैसे गुंतवायला लावत लाखोंचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सॲप मेसेजिंग आणि कॉलला पर्याय म्हणून टेलिग्रामचा वापर वाढला असतानाच ठगांकडून फसवणुकीसाठी ही याच टेलिग्रामचा वापर सुरू केला आहे.

तरन्नुम मौला लांडगे (वय ४२, रा. रावेत) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली असून, अलिशा आणि एलिना (पूर्ण नाव पत्ता उपलब्ध नाही) या दोघींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लांडगे यांना नोकरीची गरज होती. त्यासाठी त्यांनी विविध ठिकाणी नोकरी मिळावी म्हणून अर्ज केले होते.  त्याआधारे तरन्नुम यांना इओ ब्रुनेट कंपनीचा व्हाट्सॲपवर मेसेज आला. यापुढील सर्व कामकाज आणि व्यवहार टेलिग्रामच्या माध्यमातून चालेल, असे सांगण्यात आले.  

एका टेलिग्राम ग्रुपमधून विविध टास्क दिले जातील. त्यानंतर त्यापोटी ठराविक रक्कम दिली जाईल, असे आमिष दाखविण्यात आले. त्यानंतर तरन्नुम यांना आरोपींनी आपल्या बँक खात्यामध्ये तीन टप्प्यांत ५ लाख ९० हजार रुपये भरण्यास भाग पाडले. सुरुवातीला २० टास्क तरन्नुम यांना देण्यात आले. त्यातील काही पोस्टला लाईक आणि शेअर करण्यास सांगण्यात आले होते.

ऑनलाईन स्वरूपात सगळे काम असून, पैशांची भरणा अथवा त्यापोटी मिळणारे मानधनदेखील ऑनलाईन दिले जाईल, असे तरन्नुम यांना सांगण्यात आले होते. आरोपींनी एक वेबसाईट तयार केली होती. या साईटवर मानधन मिळालेले दाखवून तरन्नुम यांना अतिरिक्त पैसे भरण्यास सांगितले गेले होते.

कालांतराने या मोबदला मिळणाऱ्या पैशांसाठी टॅक्स भरावा लागेल, असे आरोपींकडून सांगण्यात आले. तरन्नुम आणि अन्य दोन सदस्य असा तिघांचा स्वतंत्र ग्रुप करून, ‘टॅक्स न भरणाऱ्याला ग्रुपमधून काढून टाकले जाईल. एकाला काढून टाकले किंवा एखादा स्वतःहून ग्रुपमधून बाहेर पडल्यास अन्य दोघांना पैसे दिले जाणार नाहीत,’ असेही सांगण्यात आले होते. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावरदेखील तरन्नुम यांना ग्रुपमधील अन्य दोन सदस्यांनी दबाव टाकून अतिरिक्त पैसे भरण्यास भाग पाडले.

प्रीमियम टास्क आणि रेग्युलर टास्कमध्ये गुगल रेटिंग दिले की पैसे मिळणार, असे सांगत लांडगे यांची फसवणूक करण्यात आली आहे. टेलिग्राम ग्रुपमध्ये चालणाऱ्या विविध टास्कच्या माध्यमातून शहरातील अनेकांची फसवणूक केली गेली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story