वृद्धेचा खून करणारा अल्पवयीन मुलगा ताब्यात
रोहित आठवले
TWEET@RohitA_mirror
छताचे सिमेंटचे पत्रे फोडून घरात प्रवेश करीत महापालिकेतील निवृत्त ८५ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणात पिंपरी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या अल्पवयीन मुलावर यापूर्वी विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून, चोरीच्या उद्देशानेच त्याने हा खून केल्याचे उघड झाले आहे. पिंपरीतील सॅनिटरी चाळ येथे ३१ जुलै रोजी ही घटना उघडकीस आली होती. त्यानंतर कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनंतर तब्बल आठवडाभराने पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
सुनीता भीमराव कांबळे (वय ४८, रा. पिंपळे गुरव) यांनी शनिवारी (५ ऑगस्ट) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे, तर शालूबाई रूपाजी साळवे (वय ८५, रा. सॅनिटरी चाळ, पिंपरी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. कांबळे या साळवे यांची नात आहेत. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात खुनाचा आणि लूटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी १७ वर्षीय अल्पवयीन सराईताला ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० जुलै रात्री साडेदहा ते ३१ जुलै रोजी सकाळी साडेदहाच्या दरम्यान सॅनिटरी चाळ येथे साळवे यांचा खून झाल्याचे उघड झाले होते. साळवे यांच्या घराच्या छताचे सिमेंटचे पत्रे तोडून ताब्यात घेण्यात आलेला चोरटा आत शिरला होता. त्यानंतर त्याने साळवे यांचा गळा दाबून आणि त्यांच्या डोक्यात जड वस्तूने प्रहार करून त्यांचा खून केला होता. त्यानंतर त्याने साळवे यांच्या अंगावरील दागिने, घरातील दागिने, रोख रक्कम, साळवे यांचा एक मोबाईल घेऊन निघून गेला होता. साळवे यांनी घराच्या लोखंडी दाराला एक कुलूप लावले होते. हे कुलूप तोडून आरोपी पसार झाला होता.
दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे साळवे यांनी दार न उघडल्याने शेजारी राहणाऱ्यांनी कांबळे यांना फोन करून याबाबत माहिती दिली होती. कांबळे यांनी आजीच्या घरी येऊन पाहणी केली तेव्हा लोखंडी दार अर्धवट उघडे असल्याचे आणि साळवे घरात जमिनीवर पडून असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे त्यांनी तत्काळ पोलिसांना घटनास्थळी पाचारण केले होते, तेव्हा जखमी अवस्थेतील साळवे यांना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचारापूर्वीच साळवे यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले होते.
साळवे यांच्या पतीचे यापूर्वी निधन झाले आहे. साळवे दाम्पत्य पिंपरी-चिंचवड महापालिकेत नोकरीला होते. निवृत्तीनंतर त्या सॅनिटरी चाळ येथे एकट्याच राहात होत्या, तर त्यांची मुलगी-जावई आणि अन्य कुटुंब शहरात विविध भागात राहतात. चोरट्याने साळवे यांच्या अंगावरील तसेच घरातल्या कपाटातील चार तोळे वजनाचे एक लाख चार हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व मोबाइल फोन चोरी करून नेला होता.
साळवे यांच्या डोक्याला मार लागल्याने मृत्यू झाला एवढीच माहिती पिंपरी पोलिसांकडे होती, तर दुसरीकडे कुटुंबीयांनी साळवे यांच्या मृत्यूनंतर चार दिवसांनी घरात पाहणी केली तेव्हा, त्यांच्याकडे असलेले काही पैसे आणि दागिने घरात नसल्याचे उघड झाले. तसेच, या दरम्यान एका अल्पवयीन सराईताकडे सध्या लाखभर रुपये आल्याची माहिती पिंपरी पोलिसांच्या तपास पथकातील अधिकारी - कर्मचाऱ्यांना खबऱ्याकडून मिळाली होती.