कराटे क्लासच्या बालहट्टामुळे गमावला जीव
रोिहत आठवले
TWEET@RohitA_mirror
कराटेचा क्लास लावण्याचा हट्ट लगेच पुरवण्यात आला नाही, म्हणून १३ वर्षीय मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जाधववाडी, चिखली परिसरात उघडकीस आली आहे. आर्यन राजू ठाणांबिर असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. आर्यन हा त्याच्या आजी-आजोबांकडे राहायला आला होता. त्याच्या वडिलांचे सात वर्षांपूर्वी निधन झाले असून, आई मुंबईत तिच्या माहेरी राहते आहे.
आर्यनच्या वडिलांचे आणि काकांचेही निधन झाले आहे. त्यामुळे तो आणि त्याची चुलत भावंडे ही जाधववाडी, चिखली येथे आजी-आजोबांकडे राहण्यास होती. मंगळवारी काकू, भावंडे आणि आजी-आजोबा घरात नसताना आर्यनने छताच्या लोखंडी अॅंगलला ओढणीच्या साहाय्याने गळफास लावून घेत आत्महत्या केली.
आर्यनला उन्हाळ्याची सुट्टी लागली होती, तेव्हापासूनच तो कराटेचा क्लास लावा म्हणून कुटुंबीयांकडे हट्ट करत होता. मात्र, काही दिवसांनी क्लास लावू असे त्याला घरच्यांनी सांगितले होते. मात्र, आजच क्लास लावा असे म्हणत त्याने घरात गोंधळ घातला. त्यानंतर कुटुंबातील इतर सदस्य त्यांच्या कामासाठी घराबाहेर गेल्याचे पाहून आर्यनने सकाळी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास गळफास लावून घेत आत्महत्या केली. त्याचे आजोबा अशोक नाना ठाणांबिर (वय ६०, रा. चिखली) हे काही वेळातच घरी आल्यावर त्यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी तात्काळ शेजारील नागरिकांच्या मदतीने आर्यनला महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, तोपर्यंत वेळ निघून गेली होती. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
मुलाचा छळ झाल्याचा आईचा आरोप
दरम्यान, या घरात माझा ज्याप्रमाणे छळ केला गेला, तसाच छळ माझ्या मुलाचाही होत असल्याचा आरोप आर्यनच्या आईने केला आहे. आर्यनचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी त्याच्या आईच्या ताब्यात देण्यात आला असून, पुढील सोपस्कार पार पाडल्यावर मी याबाबत तक्रार देण्यासाठी येणार असल्याचे आर्यनच्या आईने पोलिसांना सांगितले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.