रेल्वे केटरिंग ठेकेदाराला शिकवला धडा

रेल्वेतून प्रवास करत आहात, जेवणही रेल्वेतच करणार आहात. मग थोडे थांबा. ही बातमी वाचा. रेल्वेगाड्यांमध्ये दिल्या जाणाऱ्या व्हेज-नॉनव्हेज जेवणाचे दर इंडियन रेल्वे केटरिंग ॲन्ड टूरिझम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी) निश्चित केलेले असतात, पण गाड्यांमध्ये जेवण पुरविणाऱ्या ठेकेदारांकडून प्रवाशांची लूट केली जात असल्याची अनेकांची तक्रार असते. एका प्रवाशाला असाच अनुभव आला पण त्यांनी चांगलाच धडा शिकवला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Mon, 27 Mar 2023
  • 11:42 am
रेल्वे केटरिंग ठेकेदाराला शिकवला धडा

रेल्वे केटरिंग ठेकेदाराला शिकवला धडा

सुरू होती ८० रुपयांच्या ताटासाठी १२० रुपयांची वसुली; प्रवाशाच्या तक्रारीनंतर मागितली माफी आणि बिलही दिले

राजानंद मोरे

rajanand.more@civicmirror.in

TWEET@Rajanandmirror

रेल्वेतून प्रवास करत आहात, जेवणही रेल्वेतच करणार आहात. मग थोडे थांबा. ही बातमी वाचा. रेल्वेगाड्यांमध्ये दिल्या जाणाऱ्या व्हेज-नॉनव्हेज जेवणाचे दर इंडियन रेल्वे केटरिंग ॲन्ड टूरिझम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी) निश्चित केलेले असतात, पण गाड्यांमध्ये जेवण पुरविणाऱ्या ठेकेदारांकडून प्रवाशांची लूट केली जात असल्याची अनेकांची तक्रार असते. एका प्रवाशाला असाच अनुभव आला पण त्यांनी चांगलाच धडा शिकवला. बिल मागितले म्हणून जेवणाचे ताट हातातून घेऊन गेलेल्यांना पुन्हा तेच ताट त्यांच्या हातात सन्मानाने ठेवण्यास त्यांनी भाग पाडले अन् वाढीव पैसेही घेतले नाहीत.

दीपककुमार गुप्ता हे मूळचे जळगावचे आहेत. काही कामानिमित्त ते नुकतेच पुण्यात आले होते. २४ मार्च रोजी झेलम एक्स्प्रेसने ते पुन्हा जळगावला गेले. या प्रवासादरम्यान त्यांना प्रवाशांची लूट होत असल्याचे आढळून आले. अर्थात यापूर्वीही त्यांना असा अनुभव आला होता. यावेळी मात्र त्यांनी संबंधित ठेकेदाराला गुडघे टेकवायला लावले. गुप्ता यांनी व्हेज जेवणाची मागणी केली होती. त्यांच्यासोबत इतर अनेक प्रवाशांनीही जेवण मागवले होते. ‘आयआरसीटीसी’कडून गाड्यांमध्ये नाश्ता-जेवण पुरविण्यासाठी ठेकेदारांची नियुक्ती केली आहे. गाड्यांनुसार त्यांचे दरही निश्चित केले जातात. त्याप्रमाणेच ठेकेदाराने बिल देऊन पैसे घेणे अपेक्षित आहे. स्थानकांवर असलेल्या स्टॉलवर बिल देणे अपेक्षित असून तिथे तसे फलकही लावले आहेत. त्याकडे बहुतेक वेळा दुर्लक्ष केले जाते.

आपला अनुभव सांगताना गुप्ता म्हणाले, झेलम एक्स्प्रेसमध्ये व्हेज जेवणासाठी ८० रुपये दर निश्चित केला आहे. मला जेवण दिल्यानंतर त्यांनी १२० रुपयांची मागणी केली. मी ८० रुपये दर असल्याचे सांगून तेवढेच पैसे देईल, असे म्हणालो. १२० रुपये हवे असतील तर त्याचे बिल द्या, असेही सांगितले. बिलाची मागणी करताच तो कर्मचारी हातातील जेवण घेऊन गेला. त्यामुळे मी मग घडल्या प्रकाराची आयआरसीटीसी तसेच रेल्वे मंत्रालयाकडे ट्विटरवरून ऑनलाईन तक्रार केली. त्यानंतर १०-१५ मिनिटांनी आणखी एक कर्मचारी जेवण घेऊन आला. जेवणाचे पॅकेट उघडल्यानंतर पुन्हा बिलाची मागणी केली. त्यावेळी त्याने हे जेवण १२० रुपयांचे असून ८० रुपयांचे जेवण वेगळे असल्याचे सांगितले. तो पुन्हा दुसरे जेवण घेऊन आला. दोन्हीमध्ये सारखेच जेवण होते. त्यावेळीही तो चुकून हेही १२० रुपयांचे जेवण असल्याचे म्हणाला. मी पुन्हा त्यांच्याकडे १२० रुपयांचे बिल मागितले.

अखेर थोड्या वेळाने पॅन्ट्री कारचा मॅनेजर तिथे आला. तोपर्यंत मला आयआरसीटीसीकडून तक्रारीची नोंद घेतल्याचा फोन आला होता. कदाचित त्यामुळे व्यवस्थापकाचा सूर बदलला असल्याचे गुप्ता यांनी सांगितले. व्यवस्थापकाने माफी मागितली. तक्रार मागे घेण्याची विनवणी करू लागला. आमचा मालक वेगळा आहे. त्यांच्यापर्यंत हे प्रकरण गेले तर नोकरी जाईल, अशी गयावया करू लागला. पण मी १२० रुपयांच्या पावतीचा आग्रह सोडला नाही. अखेर तो खूपच विनवणी करू लागल्याने मी तक्रारीचे निवारण झाल्याचे सांगण्यास तयार झालो. त्यानंतर मग त्याने ८० रुपयांची पावती देण्याची तयारी दर्शविली. विशेष म्हणजे आधी १२० रुपयांचे जेवणाचे ताट असल्याचे सांगितले होते तेच ताट दिल्याचे गुप्ता म्हणाले.

गुप्ता यांनी संबंधित ठेकेदाराला धडा शिकवला असला तरी इतर कोणत्याच प्रवाशाने याबाबत तक्रार केली नसल्याचे त्यांना आढळून आले. इतर प्रवाशांकडूनही संबंधित कर्मचारी ८० रुपयांऐवजी १२० रुपये घेत होते. त्याचे बिलही दिले गेले नाही. प्रवाशांनीही बिल न मागता किंवा त्याची मूळ किंमत न विचारता १२० रुपये दिले. प्रत्येक जेवणाच्या ताटामागे ४० रुपये याप्रमाणे शेकडो प्रवाशांकडून संबंधितांकडून हजारो रुपयांची लूट केली जात आहे. प्रवाशांनी याबाबतीत जागृत राहणे गरजेचे आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story