व्हिंटेज पथदिव्याला लिंबू-नारळाचा उतारा

शहराचे सुशोभीकरण आणि स्मार्ट लूकच्या नावाखाली उभारलेले 'आय लव्ह' लिहिलेले साईनबोर्ड आणि स्मार्ट बसस्टॉपचा प्रयोग फसल्यानंतरही पालिका प्रशासन नव-नव्या संकल्पना राबवत सुटले आहे. कोथरूडमधील अशाच एका स्मार्ट पथदिव्याची देखभालीअभावी दुरवस्था झाली आहे. या चौकातील व्हिंटेज पथदिव्याच्या ओट्याला नागरिकांनी उतरून टाकलेले नारळ, लिंबू टाकण्याचे ठिकाण केले आहे. अशाच पद्धतीचे अनेक स्मार्ट पथदिवे शहरात विविध ठिकाणी शोभेचे बाहुले झालेले दिसत आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Wed, 5 Apr 2023
  • 09:29 am
व्हिंटेज पथदिव्याला लिंबू-नारळाचा उतारा

व्हिंटेज पथदिव्याला लिंबू-नारळाचा उतारा

स्मार्ट सुशोभीकरणाचा नकोसा घाट; कोथरूडमध्ये पथदिव्याला 'करणी' आयलँडचा थाट

विशाल शिर्के

vishal.shirke@civicmirror.in

TWEET@vishal_mirror

शहराचे सुशोभीकरण आणि स्मार्ट लूकच्या नावाखाली उभारलेले 'आय लव्ह' लिहिलेले साईनबोर्ड आणि स्मार्ट बसस्टॉपचा प्रयोग फसल्यानंतरही पालिका प्रशासन नव-नव्या संकल्पना राबवत सुटले आहे. कोथरूडमधील अशाच एका स्मार्ट पथदिव्याची देखभालीअभावी दुरवस्था झाली आहे. या चौकातील व्हिंटेज पथदिव्याच्या ओट्याला नागरिकांनी उतरून टाकलेले नारळ, लिंबू टाकण्याचे ठिकाण केले आहे. अशाच पद्धतीचे अनेक स्मार्ट पथदिवे शहरात विविध ठिकाणी शोभेचे बाहुले झालेले दिसत आहेत.  

लाखो रुपयांच्या स्मार्ट बस स्टॉपची दुरवस्था पुणेकर अनुभवत आहेत. फ्री वायफाय, सीसीटीव्ही, प्रथमोपचार पेटी अशी आकर्षक स्वप्ने दाखवणाऱ्या या बसस्टॉपची अवस्था अत्यंत दयनीय आहे. त्यानंतर आय लव्हच्या फलकांनी शहरात घातलेला धुमाकूळही पुणेकरांनी अनुभवला आहे. त्यानंतर आता पालिका प्रशासनाने व्हिंटेज पथदिव्यांची संकल्पना राबवण्याचे काम सुरू केले आहे. गेल्या काही वर्षांपासून शहरात साधे पथदिवे कोणालाच नको आहेत. स्टीलचे, तांब्याचे  आकर्षक कलाकुसर असलेले पथदिवे बसवण्याची लाट सुरू आहे. साहजिकच असे पथदिवे साधारण पथ दिव्यांपेक्षा महागडे असतात. मात्र, याची देखभाल न केल्याने ते शोभा वाढवण्याऐवजी परिसराची शोभा घालवत असल्याचे दृश्य ठिकठिकाणी दिसत आहे.  

कोथरूड पोलीस चौकीसमोरील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौकात आकर्षक पथदिव्यांचा आयलँड उभारण्यात आला आहे. ब्रिटिशकालीन दिव्यांची आठवण करून देणारी कलाकुसर त्यावर दिसून येत आहे. चार दिवे आणि चारही दिशांना चार घड्याळे असलेला हा आकर्षक पथदिवा आहे. मात्र देखभाल नसल्याने हा दिवा आणि त्यातील घड्याळे बंद पडली आहेत. यातील एक दिवा निखळून पडण्याच्या अवस्थेत आहेत. या उपयोगशून्य आयलँडचा वापर अंधश्रद्धा लोकांनी सुरू केल्याचे 'सीविक मिरर' प्रतिनिधीच्या पाहण्यात आले. सुशोभीकरणासाठी उभारलेले पथदिव्यांचे आयलँड लिंबू आणि नारळाचा उतारा ठेवण्याचे ठिकाण झाले आहे. या पथदिव्यांची किंमत अडीच लाख रुपयांच्या घरात असल्याचे काही अधिकारी खासगीत सांगतात. अशाच पद्धतीचे कमी अधिक कलाकुसर असलेले पथदिवे शहरात विविध ठिकाणी दिसत आहेत. या दिव्यांची दुरवस्था झाल्याचे 'सीविक मिरर'च्या पाहणीत समोर आले आहे. केवळ अधिक किमतीचे म्हणून असे दिवे शहरात बसवण्यात आले की काय अशी शंका नागरिक उपस्थित करत आहेत.  

 

पुणे शहरात सुशोभीकरणाच्या नावाखाली अनेक गोष्टी उभारण्यात येत आहेत. मात्र, अशा वस्तूंची देखभाल केली जात नाही. त्यामुळे अशा कामांवर करदात्यांचे लाखो रुपये निष्कारण खर्च होतात. त्यामुळे अशी सुशोभीकरणाची कामे महापालिकेने करू नयेत. उलट यावर होणारा अतिरिक्त खर्च आरोग्य, शिक्षण आणि रस्ते यावर खर्च करावा. त्यामुळे पैसे सत्कारणी लागतील, अशी भावना कोथरूडमधील सामाजिक कार्यकर्ते अमोल काळे यांनी व्यक्त केली आहे.

स्वारगेट येथील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत गांधी म्हणाले, साधे पथदिवेदेखील प्रकाश देतात. तेच काम सुशोभित केलेले पथदिवे करतात. मात्र त्यांची देखभालच केली नाही तर ते निरूपयोगी ठरतात. उगाचच दिखाव्यासाठी मोठा खर्च करून असे पथदिवे उभारण्याची गरजच काय? शिक्षण आणि आरोग्य अशा गोष्टींवर अधिक खर्च केल्यास त्याचा सामान्य पुणेकरांना उपयोग होईल.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story