संजय शिरसाटांविरोधात अब्रूनुकसानीचा दावा दाखल
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिवसेना आमदार संजय सिरसाट यांच्या विरोधात पुणे सत्र न्यायालयात ३ रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. यासाठी सुषमा अंधारे यांना ४७ वकीलांनी वकीलपत्र दिले आहे. दिवाणी आणि फौजदारी अशा दोन्ही प्रकारचे दावे दाखल करण्यात आले आहेत. अंधारे यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी हा दावा दाखल करण्यात आला आहे.
संजय सिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडलेल्या एका जाहीर सभेमध्ये सुषमा अंधारे यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केले होते. यानंतर अंधारे यांनी नोटीसही बजावली होती. आज पुणे सत्र न्यायालयात दावा दाखल केला आहे. दावा दाखल केल्यानंतर अंधारेंनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना अंधारे म्हणाले की, “खोके सत्ता पद हे आमच्या डोक्यात नाही. संविधानिक चौकट पार करणारी मी आहे. नोटीशीच्या नंतर जो कालावधी असतो त्या कालावधीत आम्ही वाट बघितली. त्यानंतर आम्हाला जेव्हा वाटले की कोर्टाची पायरी चढावी लागेल. त्याच्यानुसार आम्ही कोर्टाची पायरी चढली आहे.”
“शिंदे गटाच्या प्रत्येक आमदाराला समज देणे हाच आमचा यातून प्रयत्न आहे. आमच्यावर सरकारकडून दबाव आणण्याचा प्रयत्न केला. संभाजीनगरच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत मला आमिष देखील दाखवले गेले. अधिकाऱ्यांचा उल्लेख मी करणार नाही. अन्यथा त्यांना अडचण होईल. आम्ही वारंवार लढाई लढणार”, असेही सुषमा अंधारे यावेळी बोलताना म्हणाल्या.