एक हेरिटेज वाॅक, शनिवार वाडाग्रस्तांसाठी...
अनुश्री भोवरे
TWEET@Anu_bhoware
हेरिटेजग्रस्त समितीच्या सदस्यांनी शहरात रविवारी (दि. २३) सकाळी एक वैशिष्ट्यपूर्ण हेरिटेज वॉकचे आयोजन केले होते. या पदयात्रेत सहभागी स्थानिकांनी शनिवार वाड्याच्या १०० मीटरच्या परिघात त्यांनी फेरफटका मारला. या परिसरातील मोडकळीस आलेल्या घरांचे नूतनीकरण आणि हेरिटेज कायद्यात सुधारणा करण्याची मागणी करत त्यांनी केलेली घोषणाबाजी लक्षवेधी ठरली.
वारसा कायद्यानुसार सांस्कृतिक वारसा स्थळे, कलाकृती, इमारती, लँडस्केप, ऐतिहासिक, पुरातत्त्वीय महत्त्व असलेल्या वस्तू आणि वास्तूंचे संरक्षण करावे लागते. या कायद्यानुसार कोणत्याही हेरिटेज साइटच्या १०० मीटर परिसरात कोणतेही बांधकाम किंवा विकासकामांना परवानगी देता येत नाही. मात्र, शनिवार वाड्याच्या परिसरात बांधलेली घरे अत्यंत धोकादायक अवस्थेत आहेत. तरीही हेरिटेज कायद्यामुळे या परिसरातील रहिवासी कोणतेही नवे बांधकाम किंवा नूतनीकरण करू शकत नाहीत, त्यामुळे कायद्यात बदल करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली.
या फेरीच्या वेळी वारसाबाधित समितीचे प्रमुख सुनील तांबट यांनी पुरातत्त्व विभागाच्या नियमांनुसार शनिवार वाडा या ऐतिहासिक वारसा स्थळाच्या १०० मीटर परिघात कोणत्याही बांधकामास परवानगी नसल्याचे निदर्शनास आणून दिले. ‘‘यामुळे आजूबाजूचे जुने, जीर्ण झालेले वाडे, इमारती आणि घरे यांचा पुनर्विकास करता येत नाही. या वाड्यांमध्ये राहणारे असंख्य रहिवासी गरीब परिस्थितीत जगत आहेत. किंबहुना, त्यांची घरे कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे. नाजूक आर्थिक परिस्थितीमुळे या नागरिकांना घरही बदलता येत नाही आणि पिढ्यानपिढ्या हे नागरिक येथे राहात आहेत. या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आम्ही या हेरिटेज वॉकचे आयोजन केले आहे,’’ असे त्यांनी सांगितले.
‘सीविक मिरर’सोबत संवाद साधताना स्थानिक रहिवासी मुरलीधर देशपांडे म्हणाले, ‘‘शनिवार वाड्याच्या १०० मीटर परिसरात कसबा पेठ, बुधवार पेठ, शनिवार पेठ आणि शिवाजीनगर येथे अनेक रहिवासी जीर्ण झालेल्या इमारतींमध्ये राहतात. हेरिटेज कायद्यानुसार, रहिवाशांना वारसा स्थळाच्या १०० मीटरच्या परिघात बांधलेल्या घरांच्या नूतनीकरणाची परवानगी नाही. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी आम्ही पुणे महापालिका, हेरिटेज सेल, पंतप्रधान कार्यालय आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना पत्र पाठवले आहे. पालकमंत्र्यांनी त्यांच्या समस्या ऐकून घेतल्यानंतर हेरिटेज कायद्यातील दुरुस्तीबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले आहे.’’
इतिहासकार पांडुरंग बलकवडे आणि माजी नगरसेवक सुहास कुळकर्णी यावेळी उपस्थित होते. ‘‘या परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या समस्या नेमकेपणाने जगासमोर याव्या, यासाठी हा ‘हेरिटेज वाॅक’ आयोजित केला होता. कुठल्या परिस्थितीत येथील नागरिक जीवन जगत आहेत, ही वस्तुस्थिती सगळ्यांच्या निदर्शनास यावी तसेच येथील नागरिकांच्या समस्या समजून घेऊन शासन-प्रशासनाने त्यांना सुरक्षित घरे उपलब्ध होण्याच्या दृष्टीने योग्य ते निर्णय घ्यावे, ’’ अशी मागणी सुहास कुळकर्णी यांनी केली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.