खडकीत चिमुरडीचा गळा आवळून निनर्घृण खून
सीविक मिरर ब्यूरो
खडकीत अवघ्या तीन वर्षाच्या चिमुरडीचा गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली असून त्यामुळे खडकी आणि परिसरात खळबळ उडाली आहे. हा खून कशासाठी झाला असावा याचा उलगडा होत नाही. चिमुकलीची ओळख पटलेली नाही. तसेच हा खून कोणी केला याचाही तपशील कळलेला नाही.
याप्रकरणी खडकी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. या चिमुकलीची ओळख पटलेली नसून मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला आहे.
आरोपीचा शोध घेण्यासाठी खडकी पोलिसांसह गुन्हे शाखेची पथके रवाना करण्यात आलेली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास खडकी रेल्वे स्टेशन ते खडकी बाजार रस्त्याच्या दक्षिण बाजूस सी ए एफ सी डी ग्राउंडजवळ एका लहान मुलीचा मृतदेह आढळून आला. ही माहिती पोलीस नियंत्रण कक्षाकडून खडकी पोलिसांना देण्यात आली. खडकी पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी चिमुकलीचा गळा आवळून खून केल्याचे आढळले.
या घटनेमुळे परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. अवघ्या तीन वर्षाच्या चिमुकलीच्या खुनामुळे लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. हा खून नेमका कोणत्या कारणासाठी झाला? हे अद्याप समजू शकलेले नाही. चिमुकलीची ओळख पटविण्यासाठी खडकी पोलीस स्टेशन किंवा गुन्हे शाखा पुणे शहर पोलीस यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास खडकी पोलीस स्टेशनचे गुन्हे निरीक्षक मानसिंग पाटील करीत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.