अतिसुरक्षित परिसरातून चंदनाची झाडे चोरणारी टोळी गजाआड
सीविक मिरर ब्यूरो
औंध परिसरातील राजभवन तसेच राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या (एनसीएल) आवारातून चंदनाची झाडे कापून नेणाऱ्या चोरट्यांच्या टोळीला अखेर चतु:शृंगी पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून २५ किलो चंदनाची लाकडे जप्त केली. या टोळीने शहरातील अनेक सरकारी, निमसरकारी संस्था व खासगी मालमत्तेमध्ये चंदनाच्या झाडांची चोरी केल्याचे समोर आले आहे. त्यांच्याविरुद्ध शहरात सात ठिकाणी चंदन चोरी केल्याचे गुन्हे दाखल आहेत.
कैलास अगिवले (वय २१, रा. बाभूळवडे, जि. नगर), सुनील अगिवले (वय २०, रा. संगमनेर, नगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. शहराच्या वेगवेगळ्या भागात मागील काही वर्षांपासून शहरात विशेषतः खडकीतील दारुगोळा कारखाना परिसर, लष्करी वैद्यकीय महाविद्यालय, एनसीएल अशा संस्थांच्या आवारातून चंदन चोरीचे प्रकार घडत होते. चतु:शृंगी पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या राजभवन येथेही चोरट्यांनी चंदनाच्या झाडांची चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला.
याची गांभीर्याने दखल घेत अखेर चतु:शृंगी पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोलीस कर्मचारी सुरेश काशीद आणि अशोक ननवरे रात्रपाळीत गस्त घालत होते. त्यावेळी त्यांनी राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या आवारात दोघेजण चंदनाचे झाड चोरी करण्यासाठी आले असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार त्यांनी संशयित आरोपींना पाहिले. तेव्हा चोरट्यांनी तेथून पळून जाण्यास सुरुवात केली. त्यावेळी पोलीस कर्मचारी काशीद व ननवरे यांनी त्यांचा पाठलाग करून दोघांना पकडले. पोलिसांनी त्यांच्याकडून २५ किलो चंदनाची झाडे जप्त केली. पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलीस उपनिरीक्षक नीलेशकुमार महाडिक, कपिल भालेराव, शेरू वाघवले, इरफान मोमिन, आशिष निमसे, बाबुलाल तांदळे, मारुती केंद्रे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.