कार चोरणारी टोळी मुद्देमालासह अटकेत
सीविक मिरर ब्यूरो
पुण्यातून चारचाकी वाहने चोरून ती थेट चेन्नईत विकली जात असल्याचा प्रकार पुणे ग्रामीण पोलिसांनी उघडकीस आणला आहे. पोलिसांनी वाहनचोर टोळीचा पर्दाफाश करत चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत.
या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी रवींद्रम गोपीनाथम (वय ४५, रा. वेल्लूर), राजा कल्याण सुंदराम (वय ३२, रा. तांबरम, चेन्नई), यादवराज शक्तिवेल (वय २१) यांना तर, त्यांच्याकडे वाहने विक्री करणाऱ्या आर. सुधाकरन (वय ३८) याला अटक केली आहे. त्यांच्याकडून ३० लाख रुपये किमतीची चार वाहने जप्त करण्यात आली आहेत. पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी या संदर्भात शुक्रवारी (दि. २१) पत्रकार परिषदेत माहिती दिली.
गेल्या काही महिन्यांपासून शिरूर तालुक्यातून चारचाकी वाहने चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले होते. त्यात स्विफ्ट डिझायर कार चोरीस जात होत्या. चार महिन्यात पाच गुन्हे नोंद झाले होते. त्यामुळे पोलिसांनी या घटनांवर लक्ष केंद्रित केले. चोरट्यांची माहिती काढत असताना पोलिसांनी चोरीची वाहने नेमकी जातात कुठे, याबाबत माहिती घेतली असता सदर वाहने तमिळनाडू राज्यातील चेन्नई येथे जात असल्याचे समोर आले.
त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक अविनाश शिळीमकर आणि पथकाने चेन्नईत जाऊन तळ ठोकला. पोलिसांनी माहिती घेऊन राजा, रविंद्रम आणि यादवराज यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चार कार मिळाल्या. त्यांना या कार आर. सुधाकरन याने दिल्याचे समजले. पोलिसांनी त्याचा शोध घेतला. यावेळी तांत्रिक माहितीनंतर तो जालना जिल्ह्यातील शाहगढ येथे असल्याचे समजले. शाहगड येथे जाऊन पुणे ग्रामीण पोलिसांनी त्यालाही बेड्या ठोकल्या.
‘‘ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने गेल्या महिन्यापासून ५० वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. चोरी प्रकरणात एकूण १२ आरोपींना पकडले आहे. त्यांच्याकडून चारचाकींसह अनेक दुचाकीदेखील जप्त केल्या आहेत,’’ अशी माहिती पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, लोणावळा उपविभागीय अधिकारी सत्यसाई कार्तिक, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर आणि इतर अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.