फेसबुक फ्रेंडच्या प्रसंगावधानाने वाचले मित्राचे प्राण
नितीन गांगर्डे
मानसिक नैराश्यातून झोपेच्या दहा गोळ्या खाऊन आत्महत्येच्या प्रयत्न करणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनिअरचा प्राण पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला आहे. अमित भागवत असे या सॉप्टवेअर इंजिनिअरचे नाव असून फेसबुकवर अखेरचा निरोप घेत असल्याची पोस्ट करत खाली फाशीच्या दोराचा फोटो टाकला होता. योगायोगाने ही पोस्ट अमितचे फेसबुक फ्रेड असलेले भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते पुष्कर तुळजापूरकर यांनी पाहिली. त्यांनी तातडीने अमितशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, फोन बंद असल्यामुळे पुष्कर यांनी तातडीने पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक यांना याची कल्पना दिली. त्यांनी तातडीने यंत्रणा कामाला लावल्याने अवघ्या अर्ध्या तासात पोलीस भागवत यांच्या घरी पोहोचले आणि त्यांना रुग्णालयात हलवले. पुष्कर यांच्या प्रसंगावधानाने मित्राचे प्राण वाचले.
ही घटना शुक्रवार, २१ जुलैला रात्री अकरा वाजता एरंडवणे भागात घडली. भागवत यांनी आत्महत्या करत असल्याची पोस्ट करत मोबाईल बंद केला. योगायोगाने तुळजापूरकर यांनी पोस्ट पाहून प्रथम भागवत यांच्याशी आणि नंतर पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांना तत्काळ कार्यवाहीच्या सूचना दिल्या. अलंकार पोलिसांनी माहिती मिळताच स्थानिकांना फोन करत भागवत यांचे ठिकाण शोधले. घटनास्थळ एरंडवणे भागात असल्याचे पोलिसांना समजले. पोलीस यंत्रणा कामाला लागली. पोलिसांनी काही मिनिटातच घटनास्थळी धाव घेत भागवत यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. गंभीर स्थिती असलेल्या भागवत यांना गोल्डन अवरमध्ये रुग्णालयात पोहचवल्याने त्यांचे प्राण वाचले. पोलिसांच्या या संवेदनशीलतेचे आणि तत्परतेचे समाज माध्यमांतून नागरिक कौतुक करत आहेत.
ठिकाण समजल्यावर अलंकार पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत सपकाळे, करिष्मा शेख, पोलीस अंमलदार राठोड, चव्हाण हे तत्काळ घटनास्थळी पोहचले. पोलीस घरात गेले त्यावेळी भागवत हे बेडवर बेशुद्ध अवस्थेत पडले होते. पोलिसांनी त्यांना पाणी देण्याचा, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते काहीच प्रतिसाद देत नव्हते. पोलिसांनी रुग्णवाहिका बोलावली तर आणखी वेळ जाण्याची शक्यता होती. त्यामुळे त्यांनी झोळी करून भागवतांना खाली नेले. तेथून खासगी वाहनातून जवळच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू झाले. आता त्यांची तब्येत स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अमोल झेंडे यांनी मिररशी बोलताना सांगितले की, “मला फोन येताच मी फोन नंबरवरून पत्ता शोधण्याचा प्रयत्न केला. नंबर बंद असल्याने पत्ता शोधता आला नाही. आम्हाला कसेही करून त्यांचे प्राण वाचवायचे होते. भागवतांच्या एका कॉमन मित्राकडून आम्हाला पत्ता मिळाला आणि अलंकार पोलीस स्टेशनचे पथक तत्काळ एरंडवणे येथे घटनास्थळी रवाना झाले. पोलिसांनी खासगी वाहनातून भागवत यांना रुग्णालयात दाखल केले. ही कामगिरी अंदाजे ३० मिनिटांत पूर्ण झाली. एक जीव वाचवण्यात आम्ही यशस्वी झालो याचा आनंद आहे. मी नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी ११२ वर कॉल करून किंवा जवळच्या पोलीस स्टेशनला भेट देऊन कोणतीही अनपेक्षित परिस्थिती आढळल्यास त्वरित पोलिसांना कळवावे. या कामगिरीने हे सिद्ध केले आहे की जनता आणि पोलिसांतील समन्वयाने आपण चांगले परिणाम देऊ शकतो.”