सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीला डागडुजीदरम्यान आग
नितीन गांगर्डे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीत देखभाल-दुरुस्तीचे काम करणाऱ्या मजुरांच्या हलगर्जीपणामुळे आग लागल्याची घटना शनिवारी घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसून, महाराष्ट्र सुरक्षा महामंडळाच्या जवानांनी वेळीच घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनीही आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची इमारत जुनी असल्याने पावसाळ्यामध्ये ती गळते. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वीच इमारतीचे दुरुस्तीचे काम सुरू होते. इमारतीच्या वरच्या बाजूला छतावर डांबर ओतून त्यावर शीट बसवण्याचे काम मजूर करत होते. शीट डांबरावर घट्ट बसावे म्हणून त्याला वितळवले जात होते. त्या वेळी अचानक आग लागली आणि ध्वजाकडे जाण्यासाठी असलेल्या लाकडी सागवानी जिन्याने पेट घेतला. डांबर वितळवले जात असताना निष्काळजीपणा झाल्याने आग लागली. संध्याकाळी सुटलेल्या वाऱ्यामुळे आग भडकली आिण धुराचे लोट येऊ लागले.
घटनेची माहिती मिळताच तत्काळ महाराष्ट्र सुरक्षा महामंडळाचे जवान घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर थोड्याच वेळात अग्निशमन दलही आले. तोपर्यंत विद्यापीठातील सुरक्षारक्षकांनी आग विझवण्याचे साधन (फायर एक्सटिंग्विशर) वापरून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू केले होते. इमारतीच्या छतावर जाण्यासाठीचा जिना अरुंद असल्याने एका वेळी एकच व्यक्ती तेथे जाऊ शकत होती. अग्निशमन दलाची गाडी पोहोचताच त्यांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. त्यानंतर कुलिंग करून साडेसहा वाजता परिस्थिती पूर्ववत झाली.
विद्यापीठाचे कुलसचिव प्रफुल्ल पवार यांनी सांगितले की, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली, असेच म्हणायला हवे. अग्निशमन अधिकारी कमलेश सनागळे यांच्यासोबत चालक अनिल निकाळजे, फायरमन वाजे, स्वप्नील वाघमारे, ओंकार कांबळे अशा आठ जवानांच्या पथकाने आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.