बोगस डॉक्टरला कारवाईचा डोस
सीविक मिरर ब्यूरो
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे अधिकृत नोंदणी नसलेल्या लोहगाव परिसरातील एका बोगस डॉक्टरवर महापालिकेच्या आरोग्य विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. बोगस डॉक्टरवरील नवीन वर्षातील ही पहिली कारवाई ठरली.
हा डॉक्टर लोहगाव परिसरातील होमिओपॅथीची प्रॅक्टीस करत होता. कौन्सिलने याबाबत महापालिकेकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीनंतर बोगस डॉक्टरविरोधी समितीकडून कागदपत्रांची पाहणी करण्यात आली. त्यानंतर विमानतळ पोलीस ठाण्यात क्षेत्रीय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तक्रार नोंदवली. बोगस वैद्यकीय व्यावसायिक शोध मोहिमेअंतर्गत महापालिकेतर्फे ही कारवाई करण्यात आली आहे.
बेकायदेशीर वैद्यकीय व्यवसाय, चुकीचे उपचार करणाऱ्या अधिकृत नोंदणी नसणाऱ्या डॉक्टरांविरोधात नागरिक, संस्था महापालिकेकडे तक्रार करू शकतात. कागदपत्रांची शहानिशा करून तातडीने कारवाई केली जाईल, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. आशिष भारती आणि सहायक आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना बळीवंत यांनी दिली. आतापर्यंत शहरात ४७ बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली आहे.
राज्य सरकारच्या आदेशानुसार, २०१२ पासून महापालिकेतर्फे बोगस डॉक्टर शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. महापालिका आयुक्त या समितीचे अध्यक्ष असतात, तर आरोग्य प्रमुख समितीचे सचिव असतात. याशिवाय, पोलीस प्रशासनाचा प्रतिनिधी, अन्न आणि औषध विभागाचा प्रतिनिधी, कायदेशीर प्रतिनिधी, क्षेत्रीय स्तरावरील वैद्यकीय अधिकारी आणि सहायक आरोग्य अधिकारी, सामाजिक संस्थेचा प्रतिनिधी हे समितीचे सदस्य असतात. समितीची बैठक दर दोन-तीन महिन्यांनी घेतली जाते. यामध्ये कामकाजाचा आढावा घेणे, नवीन तक्रारींविषयी चर्चा करणे, कार्यवाही करणे याबाबत बैठकीत चर्चा होते. त्यानंतरच उपरोक्त निर्णय घेण्यात आल्याचे डॉ. बळीवंत यांनी नमूद केले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.