Childhood in furnace : भट्टीत करपलं बालपण, आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त विशेष स्टोरी

मध्यरात्रीच्या ठोक्याला दिवस सुरू होणाऱ्या वीटभट्टी कामगारांना कमाई करण्यासाठी प्रचंड कष्ट उपसावे लागतात. या कामी त्यांची लहान मुलेदेखील आपल्या परीने योगदान देत असतात. परिस्थितीसमोर इलाज नसल्याने अशा बालकांचे बालपण वीटभट्ट्यांवर हरवत असल्याचे दिसून येते.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Mon, 1 May 2023
  • 11:59 am
भट्टीत करपलं बालपण, आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त विशेष स्टोरी

भट्टीत करपलं बालपण, आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त विशेष स्टोरी

ओश्विन कढव

feedback@civicmirror.in

TWEET@civicmirror

मध्यरात्रीच्या ठोक्याला दिवस सुरू होणाऱ्या वीटभट्टी कामगारांना कमाई करण्यासाठी प्रचंड कष्ट उपसावे लागतात. या कामी त्यांची लहान मुलेदेखील आपल्या परीने योगदान देत असतात. परिस्थितीसमोर इलाज नसल्याने अशा बालकांचे बालपण वीटभट्ट्यांवर हरवत असल्याचे दिसून येते.

वीटभट्टी कामगारांचा दिवस घाई गडबडीत सुरू होतो. डोक्यावर कापड बांधून आणि हातांवर ग्लोव्ह्ज चढवून ते वीटभट्टीभोवती गोळा होतात. सूसगाव परिसरात असलेल्या वीटभट्टीवर हे दृश्य कायमचे दिसून येते. बहुतेक एकाच कुटुंबातील दोघे-तिघे मातीच्या ढिगाऱ्यात बसून विटा तयार करण्याच्या कामात स्वत:ला झोकून देतात. यापैकी महिला विटा तयार करतात आणि पुरुष दुसऱ्या ठिकाणी नेऊन त्याला सूर्यप्रकाशात वाळवण्याची जबाबदारी पार पाडतात. प्रचंड कष्ट उपसून किमान एक हजार विटा तयार केल्यानंतर सकाळी हे कुटुंब टिनाच्या तात्पुरत्या झोपडीत परतते. त्यावेळी त्यांचे कच्चे-बच्चे गाढ झोपलेले असतात. काही काळ विश्रांती घेतल्यानंतर ते पुन्हा कामावर परततात. मात्र, यावेळी त्यांच्यासोबत लहान मुलेदेखील असतात. आपल्या आई-वडिलांना जमेल ती लहानसहान मदत करण्याची त्यांची उत्स्फूर्त भावना असते. विटांची भरलेली ट्राॅली ओढत नेणे किंवा डोक्यावर ठेवलेल्या विटा चिमुकल्या हातांच्या आधाराने पकडून इच्छित स्थळी नेऊन ठेवण्याची जबाबदारी ही बच्चेपार्टी प्रामाणिकपणे पार पाडतात. 

अनेकदा, त्यांच्या डोक्याला, हाताला हे ओझे सहन होणारे नसते.  

सूसगावमधील वीटभट्टीवर काम करण्यासाठी छत्तीसगड राज्यातील विलासपूर भागातून आलेली १८-२० कुटुंबे एका मजल्याच्या उंचीची विटांची भिंत उभारून आपली गुजराण करत आहेत. रोजगाराची कोणतीही संधी नसल्याने या गरिबांना दोन वेळच्या अन्नाची गरज पुण्याला घेऊन येते. प्रत्येक वर्षी जानेवारी ते मे या ५ महिन्यांच्या काळासाठी ही कुटुंबे वीटभट्टीवर काम करण्यासाठी पुण्यात येतात. हा हंगाम संपला की आपल्या शेतात काम करण्यासाठी ते गावी परत जातात.  पाेटासाठी वर्षात दोन ठिकाणी दीर्घकाळ राहावे लागत असल्याचा मोठा फटका या कुटुंबातील लहान मुलांना बसतो. या काळात ते शालेय शिक्षणाला मुकतात. यामुळे त्यांचे भविष्य अंध:कारमय होऊन बसते. यापैकी फारच कमी पुढचे शिक्षण घेऊ शकतात. अनेकजण नाईलाजाने वीटभट्टी कामगार म्हणून आयुष्याचा स्वीकार करतात.

‘सीविक मिरर’ने अनेकदा केलेल्या पाहणीदरम्यान, वीटभट्टीवर लहान मुले विविध प्रकारची कामे करताना आढळली. त्यांचे वय नक्की किती, हे ठामपणे सांगता येणार नाही.  यामुळे ते करीत असलेली कामे कायद्याच्या कक्षेत बसणारी आहेत की नाही, हे सांगणे अवघड आहे. ही मुले त्यांच्या कुटुंबातील मोठ्या व्यक्तींना मदत करताना दिसतात. यामुळे साहजिकच त्यांना मजुरी मिळत नाही. धुळीने माखलेले कुपोषित शरीर, फाटलेले कपडे अशा अवस्थेत ही मुले दरवर्षी काही महिने चिखल आणि धुराने भरलेल्या वातावरणात राहतात. पुढे अशाच वातावरणात राहण्याची सवय या मुलांना लागते. यामुळे शाळेत पाठवले तरी तेथे त्यांचे मन लागत नाही. त्याऐवजी वीटभट्टीवर आई-वडिलांना मदत करायला ते तयार असतात.

निरागस हास्याची धनी असलेली ८ वर्षीय पायल आपल्या आई-वडिलांना मदत करण्यासाठी डोक्यावर विटा वाहून नेते. लहान बहीण या कामात तिला मदत करते. ‘‘गावी परत गेल्यावर मला पुन्हा शाळेत जायचे आहे. आता येथे आई-वडिलांना मदत करीत असल्याने शाळेत जाता येत नाही,’’ असे ‘सीविक मिरर’ला सांगताना टपोऱ्या डोळ्यांमुळे अधिकच सुंदर दिसणाऱ्या पायलची नजर कुठेतरी हरवल्यासारखी वाटत होती.  ‘‘तुला काय व्हायचे आहे,’’ या प्रश्नाच्या उत्तरात ती लगेच म्हणाली, ‘‘डाॅक्टर! डाॅक्टर झाली की मी सर्वांवर उपचार करणार आहे. कोविडमुळे माझ्या गावात अनेकांचा मृत्यू झाला. मला लोकांचा जीव वायवायचा आहे. मात्र डाॅक्टर होण्यासाठी खूप पैसे जमवावे लागणार आहेत. त्यासाठी आम्ही सर्वांनी जास्त वेळ काम करणे आवश्यक आहे.’’

बालकामगार ही नेहमीच देशासमोरील मोठी समस्या ठरत आहे. अनेक कायदे केले आणि विविध पातळींवर प्रयत्न केले असले तरी ही समस्या कायम आहे. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या (आयएलओ) मते, जगातील सर्वाधिक बालकामगार भारतात आढळतात. विविध क्षेत्रांत काम करीत असलेल्या मुलांचा विचार करता आजघडीला ५ ते १४ वयोगटातील सुमारे एक कोटी बालकामगार भारतात आहेत. ‘चाईल्ड लेबर ॲक्ट, १९८६’ तसेच ‘राईट ऑफ चिल्ड्रेन टू फ्री ॲण्ड कम्पल्सरी एज्युकेशन ॲक्ट, २००९’ यांसारखे कायदे करून केंद्र सरकारही समस्येवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे. पण अशा कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी, हे खरे आव्हान आहे. असंघटित क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या बालकामगारांबाबत ही बाब अधिक ठळकपणे दिसून येते.

पाच वर्षांची पलपल हिला सूसमधील सरकारी शाळेत घातले आहे. मात्र  तिला आई-वडिलांसोबत वीटभट्टीवर राहायला आवडते. अशीच अवस्था अनेक मुलांची असते. त्यांच्या पालकांसमोर हेदेखील मोठे आव्हान आहे. वेळ निघून गेल्यावर तरुणपणी पश्चात्ताप, निराशा याशिवाय त्यांच्या हाती काहीही लागत नाही. सूसगावमध्ये असलेल्या वीटभट्टीतील कामगारांसाठी कोणत्याही सोई-सुविधा नाहीत. शुद्ध पाणी आणि स्वच्छ शौचालयांचा अभाव तेथे नेहमीच असतो. भर उन्हाळ्यात सर्व कामगार आणि त्यांचे कुटुंबीय चिखल, धूळ, धूर, आग यांनी वेढलेले असतात. पालक आणि मुले यांनी दिवसभर काबाडकष्ट करूनही त्यांचे दारिद्रय संपण्याची चिन्हे नाहीत.

एनजीओ आणि काही नागरी समूह देशातील बालकामगार निर्मूलनासाठी काम करीत आहेत.  त्यांच्यामार्फत बालकामगारांना शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. यामुळे त्यांच्या कुटुंबांना हातभार लागतो. याशिवाय, बालकामगारामुळे किती नुकसान होते आणि शिक्षण किती महत्त्वाचे आहे, याची जाणीव त्यांना होते.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story