थेरगावच्या चिमुकलीने पोलिसांना पळवले
रोहित आठवले
TWEET@RohitA_mirror
थेरगाव येथील शाळेतून चार वर्षीय चिमुकलीचे अपहरण झाल्याचा फोन ११२ क्रमांकावर आल्याने वाकड पोलीस आणि गुन्हे शाखेची मंगळवारी (दि. २०) चांगलीच पळापळ झाली. प्रत्यक्षात ही मुलगी खेळायला शाळेतून बाहेर गेल्यामुळे तिचे अपहरण झाल्याचा समज शाळा व्यवस्थापनाचा झाला. त्यामुळे हा प्रकार घडला.
आरोही (नाव बदलले आहे) थेरगाव येथील सेंट एलिया हायस्कूल या शाळेत ज्युनिअर केजी मध्ये शिकते. मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास ती शाळेच्या आवारात खेळत असताना अचानक बाहेर पडली. आरोही शाळेत दिसेना म्हणून शाळा व्यवस्थापनाने तिच्या घरच्यांना फोन केला. मात्र, ती घरी पाहोचली नसल्याचे समजताच शाळेकडून पोलीस नियंत्रण कक्षाच्या ११२ क्रमांकावर आरोहीचे अपहरण झाल्याचे कळवण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात चिमुकलीचे अपहरण झाले नसून ती खेळता खेळता शाळेच्या आवारातून बाहेर पडली अन् एका पादचारी व्यक्तीने तिला पोलीस चौकीत आणल्याचे समजताच पोलिसांचा जीव भांड्यात पडला.
वाकड पोलिसांना मुलीचे अपहरण झाल्याची माहिती मिळाल्याबरोबर त्यांनी याबाबत गुन्हे शाखेलाही कळवले. चार वर्षांची मुलगी बेपत्ता असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनीदेखील या घटनेची गांभीर्याने दखल घेत घटनास्थळी धाव घेतली. वाकड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त विशाल हिरे, गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त सतीश माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड, वाकड तपास पथकातील आणि गुन्हे शाखेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा मोठा फौजफाटा थेरगाव येथील शाळेच्या परिसरात दाखल झाला.
शाळेच्या परिसरातून बाहेर जाणाऱ्या मार्गांवर पोलिसांनी नाकाबंदी केली. शाळेतील आणि बाहेरच्या आवारातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली. सहायक पोलीस आयुक्तांच्या मदतीने तपासाची पुढील दिशा आखत असतानाच थेरगाव चौकीतून माहिती मिळाली की, चार वर्षांच्या एका मुलीला एका व्यक्तीने थेरगाव चौकीत आणले आहे.
या प्रकरणाचा तपास करणारे पोलीस आरोहीच्या पालकांसह थेरगाव चौकीत आले. आईला पाहताच आरोही तिच्या कुशीत विसावली. आरोही सापडल्याचे समजताच पोलिसांचा जीव भांड्यात पडला. आरोही ही शाळेतून बाहेर आल्यावर गर्दीबरोबर काही अंतर पुढे चालत गेली. त्यानंतर गर्दी ओसरल्यावर ती एकटीच फिरू लागली. ही चिमुरडी रस्ता विसरल्याचे लक्षात आल्यावर एका व्यक्तीने तिला उचलून घेत पोलिसांकडे आणून सोडले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.