मोर्चा काढणाऱ्या नागरिकांवर महावितरणकडून गुन्हा दाखल
रोहित आठवले
TWEET@RohitA_mirror
भर उन्हाळ्यात २४ तासांपेक्षा अधिक काळ विद्युत पुरवठा खंडित झाल्याने रुपीनगर तळवडे परिसरातील नागरिकांनी महावितरण कार्यालयात घुसून कर्मचाऱ्याला शिवीगाळ करीत तोडफोड केली. या प्रकरणी आठ नागरिकांवर सरकारी कामात अडथळा निर्माण करून मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैभव जिरे, दत्ता राऊत, बिभिवान पोकळे, नारायण जिरे, एक महिला आणि अन्य तिघांवर (सर्व रा. रुपीनगर, तळवडे) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर राहुल एकनाथ इंगळे (वय ३३, रा. सावतामाळी मंदिर, टॉवर लाईन, चिखली) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. विद्युतपुरवठा करणारी भूमिगत केबल तुटल्याने रुपीनगर परिसरातील विद्युत पुरवठा मंगळवारी खंडित झाला होता. हा विद्युत प्रवाह २४ तासांहून अधिक कालावधीसाठी खंडित झाला होता. त्यामुळे नागरिकांनी गणेनगर, तळवडे येथील सहायक अभियंता कार्यालयावर मोर्चा काढला. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करीत सहायक अभियंता कार्यालयातील कर्मचाऱ्यांना जाब विचारण्यास सुरुवात केली. तेव्हा तेथील कर्मचाऱ्यांनी नेहमीप्रमाणे उर्मट पद्धतीने उत्तरे देण्यास सुरुवात केल्याने संतप्त झालेल्या नागरिकांच्या भावनांचा उद्रेक होऊन तेथे गोंधळ उडाला.
गर्दीतील काही लोकांनी कार्यालयातील सामान अस्ताव्यस्त फेकले. येथील कर्मचारी इंगळे हे नागरिकांना थांबवण्याचा प्रयत्न करीत असताना, काही लोक त्यांच्या अंगावर धावून गेले आणि शिवीगाळ केली, अशी फिर्याद इंगळे यांनी दिली आहे. या सगळ्या प्रकारानंतर स्थानिक माजी नगरसेवक पंकज भालेकर यांनी महावितरण कार्यालयात जाऊन नागरिकांची आणि अधिकाऱ्यांची समजूत काढत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. नागरिकांना २४ तासांहून अधिक काळ त्रास सहन करावा लागल्याने भावनांचा उद्रेक झाल्याचे त्यांनी महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. परंतु, महावितरणचे अधिकारी तक्रार देण्यावर ठाम असल्याने अखेर नागरिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, आमच्यावर गुन्हे दाखल केले असून, यापुढे जर विद्युत पुरवठा खंडित झाला तर या भागातील महावितरण विभागाच्या कार्यालयालाच टाळे ठोकण्याचा इशारा नागरिकांनी यावेळी दिला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.