अभाविपवर गुन्हा दाखल
विजय चव्हाण
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थी संघटनेच्या आंदोलनासाठी बेकायदा मंडप टाकल्याबद्दल अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अर्थात अभाविपवर रविवारी (दि. ९) गुन्हा दाखल करण्यात आला.
या विरोधात सुरक्षा विभागाने चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मुख्य इमारतीजवळ घडलेल्या या प्रकारासाठी मालमत्ता विद्रुपीकरण कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली. सुरक्षारक्षक अशोक परभाने यांनी फिर्याद दाखल केली आहे.
‘‘सोमवारी (दि. ३) सकाळी अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांचे बेमुदत उपोषण चालू होते. यासाठी मुक्ताश्री केंद्राच्या गलांडे मंडपवाले यांनी विद्यापीठाच्या आवारात चारचाकी वाहनाने बेकायदा प्रवेश केला. मुख्य इमारतीसमोरील छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याजवळ विद्यापीठाची परवानगी न घेता मंडप टाकला. त्यासाठी बेकायदेशीर खोदकामदेखील करण्यात आले.’’ मंडप टाकल्यानंतर फलक हाती घेऊन अभाविपच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते.
या उपोषणाबद्दल अभाविपचे पुणे महानगर मंत्री शुभंकर बाचल म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांच्या समस्या घेऊन कित्येकदा आमचे कार्यकर्ते विद्यापीठात संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन द्यायला गेले, परंतु झोपलेले विद्यापीठ प्रशासन मात्र याकडे लक्ष द्यायला तयार नाही. अंतिम वर्षाचे निकाल जाहीर न होणे, वेळापत्रकातील बदलांमुळे विद्यार्थ्यांची झालेली अडचण, उत्तरपत्रिकेची छायाप्रत न मिळणे अशा समस्यांनी विद्यार्थी हैराण झाले आहेत. परीक्षा विभागाने १०६ दिवसांनी चुकीच्या पद्धतीने निकाल जाहीर केला. मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या चौथ्या वर्षाच्या प्रश्नपत्रिकेत एक प्रश्न दोनदा विचारला गेला आणि शेवटच्या पंधरा मिनिटांत प्रश्नपत्रिकेची प्रत बदलली गेली. उत्तरपत्रिकांची छायाप्रत मिळत नाही, पुनर्मूल्यांकनांचे निकाल प्रलंबित आहेत. या समस्या सोडविण्यासाठी वारंवार निवेदन देऊनही कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. याकडे विद्यापीठाने गांभीर्याने पाहावे आणि याला जबाबदार असणाऱ्यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. आमच्यावर करण्यात आलेली कारवाई चुकीची आहे’’
चतुःश्रृंगी पोलीस ठाण्याचे साहाय्यक निरीक्षक एस. एन. गुरव या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.