मतदान करणाऱ्यांना पुस्तकाचे बक्षीस!

जागतिक मराठी भाषा दिन आणि पोटनिवडणुकीतील मतदानाचे औचित्य साधून बुधवार पेठेतील साईनाथ मंडळ ट्रस्ट आणि नारायण पेठेतील संयुक्त प्रसाद मंडळ यांनी कसबा मतदारसंघातील मतदान केलेल्या मतदारांना मोफत पुस्तकवाटपाचा अनोखा उपक्रम राबवला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Mon, 27 Feb 2023
  • 08:51 am
मतदान करणाऱ्यांना पुस्तकाचे बक्षीस!

मतदान करणाऱ्यांना पुस्तकाचे बक्षीस!

जागतिक मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून कसबा मतदारसंघात अनोखा उपक्रम

नितीन गांगर्डे

feedback@civicmirror.in

जागतिक मराठी भाषा दिन आणि पोटनिवडणुकीतील मतदानाचे औचित्य साधून बुधवार पेठेतील साईनाथ मंडळ ट्रस्ट आणि नारायण पेठेतील संयुक्त प्रसाद मंडळ यांनी कसबा मतदारसंघातील मतदान केलेल्या मतदारांना मोफत पुस्तकवाटपाचा अनोखा उपक्रम राबवला.

बुधवार पेठ आणि नारायण पेठ या दोन्ही ठिकाणी मिळून एक हजार पुस्तकांचे वाटप करण्यात आले. मतदारांच्या बोटांवरील शाई पाहून त्यांना पुस्तके देण्यात आली. यामध्ये प्रवास वर्णन, क्रांतिकारकांचे चरित्र, धार्मिक, योग विषयक, पाककला, रांगोळी अशा विविध विषयांवरील पुस्तकांचा समावेश होता.    

१८ वर्षांपुढील सर्व भारतीय नागरिकांस मतदान करण्याचा अधिकार आहे. लोकशाही बळकट होण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी मतदान करणे गरजेचे असते. परंतु अनेक नागरिक आपला मतदानाचा हक्क बजावण्यास कुचराई करत असल्याचे अनेकदा दिसते. पोटनिवडणुकीत नागरिक मोठ्या संख्येने मतदानाकडे पाठ फिरवतात. तसे न होता कसबा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत मोठ्या संख्येने मतदान व्हावे, यासाठी पुण्यातल्या पीयूष शाह यांनी ही युक्ती लढवली. त्यांनी मतदान केलेल्या नागरिकांना विविध विषयांवरील पुस्तकांचे वाटप केले.

पीयूष शाह यांनी व्हाॅट्सॲपच्या माध्यमातून बहुसंख्य नागरिकांनी मतदान करावे, असे आवाहन केले होते. मतदान केलेल्या नागरिकांना विविध विषयांवरील पुस्तक मोफत दिले जाईल, असे त्यांनी त्यात कळवले होते. जागतिक मराठी भाषा दिन आणि मतदानाचे औचित्य साधून हा उपक्रम राबवण्यात आला. मतदानाचा टक्का आणि वाचनसंस्कृती वाढावी, हा या उपक्रमामागील उद्देश होता, असे शाह यांनी ‘सीविक मिरर’ला सांगितले. त्याला नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. अनेक मतदार व्हाॅट्सॲपवरील संदेश पाहून मतदानासाठी आले होते, असेही त्यांनी सांगितले. पीयूष शाह यांच्यासह अजित परांजपे, अनिल मोहिते, कुणाल आहेर, प्रशांत पंडित, नंदकुमार ओव्हाळ, सौरभ रायकर आणि गंधाली शाह यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story