'ऑनलाइन टास्क'च्या आमिषाने व्यावसायिकाला ९६ लाखांचा गंडा
#बावधन
शहरात 'ऑनलाइन टास्क'च्या आमिषाने नफा मिळवून देण्याचे प्रकार वाढीस लागले असून सायबर चोरट्यांनी एका व्यावसायिकाला ९६ लाख ५७ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला आहे.
याबाबत एका व्यावसायिकाने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार व्यावसायिक बावधन परिसरात राहायला आहेत. त्यांना समाजमाध्यमातून एक संदेश पाठविण्यात आला होता. ऑनलाइन कामात भरपूर पैसे कमाविण्याची संधी आहे, असे आमिष दाखविण्यात आले. व्यावसायिकाने संमती दिल्यानंतर सुरुवातीला त्यांना ऑनलाइन काम देण्यात आले. या कामाचे त्यांना दहा हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने पाठविण्यात आले. त्यानंतर त्यांना दहा हजार रुपये जमा करण्यास सांगण्यात आले. अशा प्रकारे व्यावसायिकाने वेळोवेळी ६८ हजार रुपये जमा केल्यानंतर त्यांना परतावा म्हणून केवळ १२ हजार रुपये देण्यात आले.
सायबर चोरट्यांनी त्यांना पैसे दिल्यानंतर व्यावसायिक जाळ्यात अडकले. चोरट्यांनी त्यांना आमिष दाखवून 'ऑनलाइन टास्क' पूर्ण करण्यास सांगितले. व्यावसायिकाने ३५ लाख रुपये जमा केले. तेव्हा चोरट्यांनी ६१ लाखांचे पाच ऑनलाइन टास्क पूर्ण करा, असे चोरट्यांनी सांगितले. व्यावसायिकाने पैसे जमा केल्यानंतर त्यांना पैसे मिळाले नाहीत. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन व्यावसायिकाने तक्रार नोंदविली. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत तपास करत आहेत.
दरम्यान, सायबर चोरट्यांकडून महिला, महाविद्यालयीन तरुणी आणि ज्येष्ठ नागरिक यांना लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे बँकेतून फोन आहे असे सांगून लुबाडणे, अश्लील संवाद किंवा चित्रफितीचा वापर करणे आदी मार्गींनी नागरिकांकडून पैसे लुबाडले जात आहेत. त्यामुळे नागरिकांनी अनोळखी व्यक्तींशी कोणत्याही प्रकारे ऑनलाईन आर्थिक व्यवहार करू नये असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.