स्टेडियमच्या नमनाला ८ कोटींचे तेल?

पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे उभारण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट स्टेडियमवरून राजकीय पक्षात आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. सल्लागाराला दिल्या जाणाऱ्या शुल्काबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. त्यामुळे एखादा प्रकल्प सुरू होण्यापूर्वीच त्यावरून वादंग होण्याची परंपरा कायम असल्याचे चित्र समोर आले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Rohit Athavale
  • Fri, 30 Jun 2023
  • 09:19 am
स्टेडियमच्या नमनाला ८ कोटींचे तेल?

स्टेडियमच्या नमनाला ८ कोटींचे तेल?

सल्लागार शुल्कावरून पक्षीय मतभेद; एक स्टेडियम असताना दुसऱ्या स्टेडियमची गरज नसल्याचा दावा

रोहित आठवले

rohit.athavale@civicmirror.in

TWEET@RohitA_mirror

पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे उभारण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट स्टेडियमवरून राजकीय पक्षात आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. सल्लागाराला दिल्या जाणाऱ्या शुल्काबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. त्यामुळे एखादा प्रकल्प सुरू होण्यापूर्वीच त्यावरून वादंग  होण्याची  परंपरा कायम असल्याचे चित्र समोर आले आहे.    

पिंपरी-चिंचवड महापालिकेने चारशे कोटी रुपये खर्च करून मोशी येथे क्रिकेट स्टेडियम उभारण्याचा निर्णय घेतला आहे. ४०० कोटींचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. त्याच्या सल्लागाराला दोन टक्के शुल्क म्हणून आठ कोटी रुपये देण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने आक्षेप घेतला असून या सर्व प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे.

पिंपरी-चिंचवड शहराच्या प्रवेशद्वारावर गहुंजे येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम असताना मोशी येथे नव्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम उभारण्याचा घाट कशासाठी घातला जात आहे. कोट्यवधींची उधळपट्टी कोणासाठी केली जात आहे. शहरातील जनतेचा कष्टाचा पैसा मनमानी पद्धतीने उधळण्याचा अधिकार प्रशासनाला कोणी दिला, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांनी उपस्थित केला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मोशी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी ४०० कोटींचा खर्च गृहीत धरून स्टेडियम उभारण्याच्या कामासाठी सल्लागार नेमण्यास आयुक्त शेखर सिंह यांनी मान्यता दिली. त्याला जवळपास १.९९ (निविदा पूर्व १.९८ टक्के तर निविदा पश्‍चात ०.१ टक्के) ओम टेक्‍नॉलिक्‍स कंपनीला देण्याचे ठरवले आहे.

मोशीतील प्रभाग क्रमांक तीन येथील आरक्षण क्र. १/२०४ येथील जागेवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी सन २०२३-२४ च्या अंदाजपत्रकात ४०० कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार महापालिकेने स्टेडियम उभारण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. यामध्ये सल्लागार म्हणून नियुक्ती देण्यास आयुक्त सिंह यांनी स्थायी समितीची मान्यता दिली आहे.

सल्लागार नेमणुकीवरून यापूर्वीही गेल्या पाच वर्षात महापालिकेतील सत्ताधारी भाजपवर अनेक आरोप झाले आहेत. आता महापालिकेत प्रशासकीय राज असून, आयुक्त शेखर सिंह हे प्रशासकाची जबाबदारी पार पाडत असतानाच सिंह भाजपची री ओढत असल्याचा आरोप देखील काटे यांनी केला आहे. पुणे जिल्ह्यात पुणे शहर, गहुंजे व बारामती अशी तीन क्रिकेट स्टेडियम आहेत. पिंपरी-चिंचवड शहरालगत गहुंजे येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम असताना नव्याने क्रिकेट स्टेडियम बांधण्याचा घाट कोणाच्या सांगण्यावरून घातला जात आहे असे विचारले आहे. या निर्णयामागे राज्यातील सत्तेत असणारे खोके सरकार व त्यांचे स्थानिक पदाधिकारी हे अंतर्गत आर्थिक तडजोडी करून प्रशासनाला हाताशी धरून शहरातील जनतेच्या कररूपाने जमा झालेल्या कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करत असल्याचा संशय नाना काटे यांनी व्यक्त केला आहे.

तसेच नव्याने विकसित करणारे क्रिकेट स्टेडियम बीओटी, पीपीई, खासगी की पालिकेच्या निधीतून करायचे हे अद्याप निश्‍चित झालेले नसले तरी त्यांच्या सल्लागारासाठी कोट्यवधीची उधळपट्टी आणि क्रिकेट स्टेडियमचा घातलेला घाट तत्काळ रद्द करा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस जनआंदोलन उभारणार असा इशारा नाना काटे यांनी दिला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story