महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात ५० ते ७५ लोकांचा मृत्यू
पनवेलमधील खारगर येथे पार पडलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात ११ जणांचा मृत्यू झाल्याचे सरकारने सांगितले होते. मात्र, यात ५० ते ७५ लोकांचा मृत्यू झाला, असे प्रत्यक्षदर्शी सागंत आहेत, असा आरोप काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे.
अतुल लोंढे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “देशाचे मोठे मोठे पुरस्कार राजभवन किंवा राष्ट्रपती भवनात होत असतात. मात्र, शिंदे-फडणवीस सरकारने हा इव्हेंट केला. यात सुमारे २० लाख लोक होती. परंतु, या सरकारने केवळ ५० जणांची खासगी सुरक्षा केली होती.”
पुढे बोलताना लोंढे म्हणाले की, “हवामान विभागाकडून वेगवेगळ्या बातम्या येत होत्या. वेगवेगळे अंदाज वर्तवले जात होते, असे असतानाही या सरकारने सकाळी १० वाजता कार्यक्रम सुरू केला. यात ५० ते ७५ लोकं मृत्युमुखी पडले आहेत असे प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत. मात्र, हे सरकार खरी माहिती लपवत आहे. घटना दाबण्याचा निर्लज्ज प्रयत्न हे सरकार करत आहे.
या कार्यक्रमासाठी कोणतीही पुर्वतयारी केली गेली नाही. कार्यक्रमाचे कुठलेही नियोजन केले गेले नव्हते. हा इव्हेंट एका वेंगुर्लेकर यांच्या मालकीची आहे. कार्यक्रमाचे टेंडर देखील ईमेलने काढण्यात आले होते. वेंगुर्लेकर हे एकनाथ शिंदे यांच्या जवळचे आहेत. या सर्व घटनेची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे”, अशी मागणी यावेळी बोलताना लोंढे यांनी केली आहे.