शाळा, काॅलेजसमोरील ४६ अवैध टपऱ्या जप्त
रोहित आठवले
TWEET@RohitA_mirror
गुटखा-तंबाखू-सिगारेट विक्री करणाऱ्या शाळा आणि महाविद्यालयाच्या १०० मीटर परिसरात असलेल्या ४६ अवैध टपऱ्या पिंपरी-चिंचवड पोलिसांनी महापालिकेच्या मदतीने गेल्या दोन महिन्यात जप्त केल्या आहेत.
शहरात बाहेरील राज्यातून येणारा गुटखा, गांजा तसेच तंबाखू आणि सिगारेट विक्री रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाकडून कारवाई केली जाते. त्याचबरोबर पोलीस ठाण्यांमधील आणि गुन्हेशाखेच्या अन्य पथकांनीदेखील आता अमली पदार्थ विरोधी मोहिम अधिक कडक करण्यासाठी कारावाईत सातत्य ठेवावे अशा स्वरूपाच्या सूचना पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी नुकतेच दिले आहेत. याअंतर्गत निगडीत १२, वाकड आणि भोसरीत प्रत्येकी ११, पिंपरीत ८, तर चिंचवडमध्ये ४ टपऱ्या जप्त करण्यात आल्या.
पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर शिरगाव पोलिसांनी मोठी कारवाई करीत १० लाखांचा गुटखा आणि ८ लाख रुपये किमतीची दोन वाहने जप्त केली. त्याचबरोबर हिंजवडी, वाकड, पिंपरी, भोसरी, म्हाळुंगे-चाकण आदी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये गांजा आणि प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त केला.
शाळा-महाविद्यालयापासून १०० मीटर परिसरात पान-तंबाखू-सिगारेट विक्रीस बंदी आहे. त्याचबरोबर काही टपऱ्यांमध्ये प्रतिबंधित गुटखा विक्री होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी आता या टपऱ्याच जप्त करण्याची मोहीम हाती घेतली आहे.
अमली पदार्थ विरोधी पथकाने चालू वर्षात पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील शाळा-महाविद्यालयांच्या १०० मीटर परिसरात असलेल्या ३११ जणांवर कारवाई केली असून, त्यापैकी २५० अवैध टपऱ्यांवर अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यासाठी महापालिकेशी पत्रव्यवहार केला आहे. आतापर्यंत त्यापैकी ४६ अवैध टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड पोलिसांनी शहरातील शाळा-महाविद्यालय परिसरात असणाऱ्या अशा स्वरुपाच्या टपऱ्यांचे सर्वेक्षण करून त्याची यादी पिंपरी-चिंचवड महापालिकेला दिली आहे. महापालिकेकडून उपलब्ध असलेल्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त बंदोबस्त पुरवत या टपऱ्या हटविण्यास सुरुवात झाली आहे. तरुणांना विद्यार्थी दशेपासूनच या सवयींपासून दूर ठेवण्यासाठी पोलिसांनी कडक धोरण हाती घेतल्याचे गेल्या काही दिवसांमधील कारवाईवरून दिसून येत आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.