सायबर चोरट्यांनी घातला २१ हजार रुपयांचा गंडा
#पद्मावती
महिला डॉक्टरला धमकावून सायबर चोरट्यांनी तिच्याकडून २१ हजार रुपये लुबाडल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली आहे. याबाबत संबंधित महिला डॉक्टरने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
तक्रारदार महिला पुणे-सातारा रस्त्यावरील एका खासगी रुग्णालयात डॉक्टर म्हणून कार्यरत आहे. रुग्णालयातील शिशू अतिदक्षता विभागात त्या नियुक्तीस आहेत. अतिदक्षता विभागात त्यांच्या मोबाइल क्रमांकावर एका तरुणीने संपर्क साधला. तरुणीने समाजमाध्यमातील सुविधेचा वापर करून संबंधित डॉक्टर महिलेला अश्लील चित्रफीत पाठविली. त्यानंतर सायबर चोरट्यांनी त्याचा स्क्रीनशॉट काढून महिला डॉक्टरला पाठवला आणि तिला धमकी देण्यास सुरुवात केली.
संबंधित स्क्रीनशॉट समाजमाध्यमात प्रसारित करण्याची धमकी चोरट्यांनी दिली आणि त्वरित ऑनलाइन पद्धतीने पैसे पाठवण्यास सांगितले. घाबरलेल्या डॉक्टर महिलेने ऑनलाइन पद्धतीने २१ हजार रुपये पाठवले. मात्र, त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पोलीस निरीक्षक सावंत या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
दरम्यान, सायबर चोरट्यांकडून महिला, महाविद्यालयीन तरुणी आणि ज्येष्ठ नागरिक यांना लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे बँकेतून फोन आहे असे सांगून लुबाडणे, अश्लील संवाद किंवा चित्रफितीचा वापर करणे आदी मार्गांनी नागरिकांकडून पैसे लुबाडले जात आहेत. त्यामुळे नागरिकांनी अनोळखी व्यक्तींशी कोणत्याही प्रकारे ऑनलाईन आर्थिक व्यवहार करू नये असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.