बलात्कार प्रकरणी शिक्षकाला १५ वर्षांची सक्तमजुरी
#निगडी
अल्पवयीन विद्यार्थिनीला विवाहाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी एका खासगी शिकवणी चालकाला न्यायालयाने १५ वर्षे सक्तमजुरी आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. विशेष न्यायाधीश के. के. जहागीरदार यांच्यासमोर ही सुनावणी झाली. दोषीने दंडाची रक्कम अपील कालावधीत पीडित विद्यार्थिनीला देण्यात यावी, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.
गोपाळ किसनराव चव्हाण (वय ३३) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे. निगडी परिसरात ही घटना घडली होती. या प्रकरणी चव्हाण याच्या विरुद्ध पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. चव्हाण भागीदारीत खासगी शिकवणी चालवत होता. त्याने अल्पवयीन विद्यार्थिनीला जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार केला. तिला विवाहाचे आमिष दाखविले होते, असे पीडित विद्यार्थिनीने फिर्यादीत म्हटले होते. या खटल्यात सरकारी वकील ॲड. सुचित्रा नरोटे यांनी बाजू मांडली. या खटल्यात सरकार पक्षाकडून आठ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली होती. पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकरराव अवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक उत्कर्षा देशमुख यांनी या प्रकरणाचा तपास करून आरोपी चव्हाण याच्या विरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. हवालदार भोसले यांनी न्यायालयीन कामकाजासाठी साहाय्य केले.
दरम्यान शिक्षक हे मुलांचे आयुष्य घडवत असतो. आरोपी शिक्षक गोपाळ चव्हाण याने अल्पवयीन विद्यार्थिनीला जाळ्यात ओढले. तिला विवाहाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. गुन्हा गंभीर असून आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची विनंती सरकारी वकील ॲड. सुचित्रा नरोटे यांनी युक्तिवादात केली. न्यायालयाने साक्ष तसेच पुरावे ग्राह्य धरून आरोपी चव्हाणला १५ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.
feedback@civicmirror.in
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.