शत प्रतिशत ‘ई’ रेल्वे
राजानंद मोरे
मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील संपूर्ण ५३१ किलोमीटर मार्गाचे विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे वर्षाला इंधनावर होणाऱ्या खर्चात सुमारे अडीचशे कोटींची बचत होत आहे. विभागातील सर्व प्रवासी गाड्या विद्युत इंजिनावर धावत असून मोजक्या मालवाहू गाड्यांनाच डिझेल इंजिन लावावे लागत आहे. २०१४ नंतर विद्युतीकरणामध्ये तब्बल नऊ पटीने वाढ झाली आहे. त्यापूर्वी केवळ पुणे ते मुंबई मार्गावरच इंटरसिटी एक्सप्रेस गाड्या विद्युत इंजिनावर धावत होत्या.
पुणे विभागात डेक्कन क्वीन ही एकमेव गाडी पूर्वीपासून इलेक्ट्रिक इंजिनवर धावत होती. त्यानंतर पुणे-मुंबईदरम्यान इंटरसिटी एक्सप्रेसची संख्या वाढत गेली. या सर्व गाड्यांनाही विद्युत इंजिन होते. डेक्कन क्वीन १ जून १९३० रोजी मुंबई ते पुणे दरम्यान धावली. त्यानंतर दुसरे विद्युतीकरण पुणे आणि दौंड दरम्यान करण्यात आले. आता त्याचा विस्तार बारामतीपर्यंत करण्यात आला आहे. हे काम २०१४ मध्ये सुरू झाले होते. ते २०१९ मध्ये पूर्ण झाले आहे. तर लोणंद-फलटणसह पुणे ते कोल्हापूर विभागाचे विद्युतीकरण २०१९ मध्ये सुरू झाले आणि काही दिवसांपूर्वीच पूर्ण झाल्याची माहिती विभागीय व्यवस्थापक इंदू दुबे यांनी दिली.
सध्या पुणे विभागात ५३१ किमी मार्गाचे संपूर्ण विद्युतीकरण झाले आहे. २०१४ पर्यंत केवळ पुणे ते लोणावळा मार्गावर ६३ किलोमीटर मार्गावरच विद्युतीकरण करण्यात आले होते. मागील वर्षभरात एक्स्प्रेस गाड्यांच्या ११ जोड्या इलेक्ट्रिक बदलण्यात आल्या. विभागात शताब्दी एक्स्प्रेस, वंदे भारत एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन, झेलम एक्स्प्रेस, दुरांतो एक्स्प्रेस, गोवा एक्स्प्रेस इत्यादी महत्त्वाच्या गाड्या इलेक्ट्रिक इंजिनावर धावतात. यामुळे पुणे विभागाच्या इंधन बिलात लक्षणीय घट झाली आहे जे प्रतिमहिना सरासरी २३०३.०४ किलोलिटर एवढी आहे. त्यातून २४६ कोटी रुपयांची बचत होत आहे. त्याचप्रमाणे वार्षिक ०.७३३ लाख टन कार्बन उत्सर्जन कमी होत आहे.
पुणे ते मिरज मार्गावर अद्यापही काही भागात मार्ग दुहेरीकरणाचे काम सुरू आहे. या मार्गावर दुहेरीकरण सुरू असतानाच विद्युतीकरणही केले जाणार आहे. मार्च २०२४ पर्यंत हे कामही पूर्ण होऊन दुहेरीकरणासह पुणे विभागातील सर्व मार्गाचे विद्युतीकरण झालेले असेल. सध्या अस्तित्वात असलेल्या मार्गांचे काम पूर्ण झाले असून रेल्वेला मोठा फायदा होत असल्याचे दुबे म्हणाल्या.