अमेरिकेमुळे युक्रेनसोबत युद्ध
#मॉस्को
आम्ही युद्ध टाळण्यासाठी सर्व पद्धतीने प्रयत्न केले, पण अमेरिका तसेच इतर पाश्चिमात्य देशांच्या आडमुठेपणामुळे ते निष्फळ ठरले. हेच देश आमच्या युक्रेनसोबतच्या युद्धाला जबाबदार आहेत, असा आरोप रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी मंगळवारी (दि. २१) केला.
रशिया-युक्रेन युद्धाला २४ फेब्रुवारी रोजी एक वर्ष पूर्ण होणार आहे. या निमित्ताने पुतीन यांनी रशियन संसदेला संबोधित केले. ते म्हणाले, ‘‘रशियाने सुरुवातीला युद्ध टाळण्यासाठी विविध प्रकारचे राजनैतिक प्रयत्न केले, पण नाटो आणि अमेरिकेमुळे ते निष्फळ ठरले. आम्ही चर्चेला तयार आहोत. पण यासाठी कोणत्याही प्रकारची पूर्वअट आम्हाला मंजूर नाही.’’
‘‘अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांकडून युक्रेनला दीर्घ पल्ल्याची सुरक्षा यंत्रणा दिली जात आहे. यामुळे आमच्या सीमा संकटात सापडल्या आहेत. रशिया-युक्रेन यांच्यातील वाद दोन देशांमधील होता. मात्र, अमेरिका आणि मित्र देशांनी त्याला जाणीवपूर्वक जागतिक स्वरूप दिले. आमची युद्ध करण्याची इच्छा नव्हती. पण अमेरिका आणि इतर देशांनी आमच्यासमोर कोणताच पर्याय ठेवला नाही. कोणतीही किंमत मोजून आम्ही आमच्या देशाची सुरक्षा करण्यास सज्ज आहोत,’’ असे पुतीन म्हणाले.
‘‘पाश्चिमात्य शक्तीमुळे युद्धाचा भडका उडाला ही वस्तुस्थिती आहे. ते लोक युक्रेनच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवत आहेत. त्यांना मूर्ख बनवत आहेत. आम्हाला आमच्या देशाची सुरक्षा करता येते. अमेरिका आणि तिचे सहकारी केवळ आपला दबदबा वाढवण्याच्या कारस्थानासाठी दुसऱ्यांना बळीचा बकरा बनवत आहेत. युद्धाचा राक्षस पाश्चिमात्य शक्तींनीच बाटलीतून बाहेर काढला. तेच आता या राक्षसाला पुन्हा बाटलीत टाकू शकतात. आम्ही केवळ आमचा देश आणि नागरिकांची सुरक्षा करत आहोत. पाश्चिमात्य शक्तींना सन्मान देणे ठावूक नाही. ते संपूर्ण जगावर थुंकण्याचा प्रयत्न करत आहेत. हाच प्रकार ते आपल्या देशातील जनतेसोबतही करत आहेत,’’ असा दावादेखील पुतीन यांनी केला.
‘जी-सेव्हन’ने युद्धावर १५० अब्ज डॉलर्स खर्च केल्याचा दावा
‘जी-सेव्हन’ या जगातील सर्वात श्रीमंत देशांच्या संघटनेने गरीब देशांच्या मदतीसाठी ६० अब्ज डॉलर दिले ही चांगली गोष्ट आहे. पण त्याच देशांनी युद्धासाठी १५० अब्ज डॉलर इतक्या प्रचंड निधीची तरतूद केली. याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. हा दुटप्पीपणा नव्हे तर दुसरे काय आहे, असा सवालही पुतीन यांनी उपस्थित केला. ते म्हणाले ‘‘आमचे युद्ध युक्रेनच्या जनतेसोबत नाही. त्यांना तेथील सरकारने ओलीस ठेवले आहे. रणांगणात रशियाचा पराभव करणे केवळ अशक्य आहे हे जगाने कान उघडून ऐकावे. पाश्चिमात्य शक्तींना युरोपमध्ये पोलिसांची भूमिका बजावायची आहे. मात्र, आम्ही आमच्या मुलांवर कोणताही धोका येऊ देणार नाही.’’ वृत्तसंंस्था